आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवानांची सैनिक कल्याण विभागाकडे नोंदच नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडे अकोला शहरासह जिल्ह्यातील एकाही जवानाची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नोंद ठेवण्याचे काम नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम निवडणूक विभाग व गृह शाखेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील जवान देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत आहेत. यामध्ये आर्मी, एसआरपी, सीआरपीएफ यासह अन्य विभागाचा समावेश आहे. काश्मीरमधील पूंछ भागात भारतीय लष्कराच्या जवानांवर पाकिस्तानच्या सैनिकांनी हल्ला चढवला. यामध्ये भारताचे पाच जवान शहीद झाले. या दृष्टीने देशासह राज्य सतर्क झाले आहे; पण याला अकोला जिल्हा प्रशासन अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे. ज्या कार्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली आहे तोच विभाग अकोला शहरासह जिल्हय़ातील जवानांच्या वस्तुनिष्ठ माहितीसंदर्भात काहीच गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात याबाबत काहीच माहिती नाही. जिल्हा सैनिक कल्याण विभागात जिल्हय़ातील एकाही जवानाची या विभागात माहिती नसणे, ही आश्चर्याची नव्हे तर गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्य शासनाने या याप्रकरणी दखल घेण्याची गरज आहे.

जबाबदारी परिवाराची
अकोला जिल्हय़ातील तरुणांना देशातील विविध राज्यांत सैन्यात नोकरी लागल्यास त्याची माहिती देण्याची जबाबदारी त्या युवकाची व परिवाराची आहे. मात्र, नोकरी लागल्यानंतर त्याची माहिती जिल्हा सैनिक विभागाकडे कधीच दिली जात नाही. त्यामुळे त्याची माहिती ठेवणे कठीण होत आहे. जितेंद्र बोरकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अकोला.

जिल्हाधिकार्‍यांचा प्रतिसाद नाही
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडे अकोला शहरासह जिल्हय़ातील कोणत्याच जवानाची माहिती नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.