शेगाव - संतगजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवाला फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली. श्रींचा हा १३७ वा प्रगटदिन असल्याने शेगावातही सध्या उत्साह संचारला आहे. भजनी दिंड्या पालख्या सध्या शेगावात येण्यास प्रारंभ झाला आहे.
विदर्भ पंढरीचा राजा संत गजानन महाराज यांचा १३७ वा प्रगटदिन ११ फेब्रुवारीला होत आहे. त्यानिमित्ताने शेगावात फेब्रुवारीपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारीला सकाळी १० वाजता महारुद्र स्वाहाकार यागास प्रारंभ झाला. या वेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील, नीलकंठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात महारुद्र यागास सुरुवात झाली. बुधवारपासून दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने येथे होणार आहेत. बाबुराव लकडे, श्रीधरबुवा आवारे, उमेश दशरथे, प्रमोदबुवा पानबुडे, पोपटबुवा कासार खेडकर, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर वऱ्हाडे, विष्णुबुवा कव्हळेकर यांची कीर्तने यामध्ये होतील.
प्रगटदिनानिमित्त संस्थानने जय्यत तयारी केली असून, भजनी दिंड्यांची शेगावात येण्याची लगबग सुरू झाली आहे. उत्सवासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. शेगाव नगरपालिका, पोलिस प्रशासनानेही उत्सवासाठी विविध उपाययोजना, सोयीसुविधा बंदोबस्ताची तयारी केली आहे.
विदर्भपंढरीमध्ये ‘श्री’च्या १३७ व्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला असून बुलडाण्यासह राज्यातील काही भागातून भजनी दिंड्या पालख्या शेगावात येण्यास प्रारंभ झाला.
आठवडाभरापूर्वीच झाले हॉटेल, लॉज बूक
यामहोत्सवासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे मंदिर प्रशासनाची निवासस्थाने "फुल्ल' असतात. त्या पार्श्वभूमीवर अनेक भाविकांनी शहरातील हॉटेल, लॉज यांचे आठवडाभरापूर्वीच आरक्षित केले आहेत. दरम्यान, शेगाव येथे पायदळ दिंड्या येणे सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.