आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर सरपंच, पोलिस पाटलांवरही होणार आता फौजदारी गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गाव शिवारातील गौण खनिजाचे रक्षण करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकार्‍यांसमवेत सरपंच, पोलिस पाटील यांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. जर गौण खनिज चोरीचे प्रकरण उघडकीस आले, तर या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा फतवा जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. गौण खनिजाचे रक्षण करण्याच्या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ८२ रेतीघाटावरून दिवसाढवळ्या गौण खनिजावर चोरटे डल्ला मारत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील नदीपात्रात एकूण १८८ रेतीघाट आहेत. या रेतीघाटांच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी मिळत असतो. मात्र, दहा वर्षांत एकदाही १८८ पैकी १८८ रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. दरवर्षी ७५ ते १०० च्या रेतीघाटांचा लिलाव बाकी असतो. किंबहुना, त्या रेतीघाटांचा लिलाव अल्पदर करूनही होऊ शकत नाही. त्यामुळे ज्या रेतीघाटांचा लिलाव होत नाही, अशा रेतीघाटावरून रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौण खनिजाची चोरी केल्या जात असल्याचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रेती धोरण कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकार्‍यांनी अ‍ॅक्शन प्लॅनमध्ये गावातील मान्यवर लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच, उपसरपंच, सदस्यांचाही समावेश केला आहे.

नेहमी दिला जातो महसूल प्रशासनाला दोष
रेतीची अवैध वाहतूक रोखण्याची जबाबदारी तलाठी, मंडळ अधिकारी तहसीलदारांचीच आहे, असे मानल्या जाते. डोळ्यादेखत होणारी चोरी रोखण्याचे साेडून महसूल अधिकार्‍यांना फोन करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करताना दिसून येतात.

असा आहे अ‍ॅक्शन प्लॅन
1.सरपंच,पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठ्यांनी लक्ष ठेवावे.
2.गौणखनिजाची चोरी करताना कुणी आढळल्यास वाहनाला थांबवा.
3.गौणखनिज चोरट्यांविरुद्ध थेट पोलिसात तक्रार द्यावी.

प्रशासनाला सहकार्य करा
आपल्या गाव, शिवारातील नदी, नाल्यांतील रेती चोरून नेताना कुणी आढळल्यास आपणही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकता. या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करूया.'' - सुनील पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.