आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूघाटांपासून मिळणार 25 कोटींचा महसूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरासह जिल्ह्यातील वाळूघाटांपासून जिल्हा प्रशासनाच्या खनिकर्म विभागाला 2013-14 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 24 कोटी 49 लाख 24 हजार 113 रुपयांचा महसूल मिळणार आहे. बाळापूर तालुक्यातून सर्वाधिक नऊ कोटी 16 लाख 27 हजार 301 रुपयांचा तर, पातूर तालुक्यातून केवळ 32 लाख 63 हजार 722 रुपयांचा सर्वात कमी महसूल प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील 257 वाळूघाटांना राज्य पर्यावरण मूल्यांकन आघात समितीने परवानगी दिली आहे. सर्वाधिक 66 वाळूघाट बाळापूर तालुक्यात आणि सर्वात कमी बार्शिटाकळी तालुक्यात आहेत. जिल्ह्यात एकूण 3 लाख 38 हजार 85 ब्रास वाळूसाठा मंजूर करण्यात आला आहे. या वाळूघाटांपासून तब्बल 24 कोटी 49 लाख 42 हजार 113 रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. यावर्षी प्रथमच जिल्हा प्रशासनाने हायटेक पद्धतीचा वापर करत जिल्ह्यातील 2013-2014 या वर्षाच्या वाळूघाटांचे लिलाव ई-ऑक्शन प्रक्रियेद्वारे तालुका व समूहनिहाय पार पाडले होते. जिल्ह्यातील उर्वरित वाळूघाटांचे लिलाव येत्या 8 व 9 जानेवारी 2014 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 51 वाळूघाटांचे लिलाव पर्यावरण आघात मूल्यांकन समितीच्या अधिनस्त करण्यात येत आहेत.

पातूर तालुका वगळता प्रत्येक वाळूघाटांची ई-निविदा सादर करता येईल. कंत्राटदारांना प्रशासनाकडे पातूर तालुक्याकरिता एक गट म्हणून वाळूघाटांसाठी ई-निविदा भरता येणार आहे. या वाळूघाटांपासून मोठा महसूल मिळणार असल्याने महसूल विभागाने याबाबत अतिशय पारदर्शक नियोजन केले आहे. जिल्हा खनिकर्म विभागातर्फे वाळूघाटांच्या ई-निविदेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उर्वरित वाळूघाटांचा फेरलिलाव होणार आहे.