आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वर सुधाकर’ने अकोलेकर मंत्रमुग्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्यातीलज्येष्ठ संगीतकार तथा सुप्रसिद्ध संवादिनीवादक सुधाकर अंबुसकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा, नव्या पिढीच्या कलावंतांचे गायन, वादकांचे फ्युजन अन् गझलनवाज भीमराव पांचाळेंची मैफील अशात अकोलेकर मंत्रमुग्ध झाले. येथील प्रमिलाताई आेक सभागृहात शनिवार, ३० आॅगस्टला सायंकाळी सोहळा रंगला.

अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण शेळके होते. व्यासपीठावर सिनेदिग्दर्शक राजदत्त, गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराव पांचाळे, ललित कला अकादमीचे उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, सातव्या मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाणे, सत्कारमूर्ती सुधाकर अंबुसकर होते. आयोजकांच्या वतीने गणेश पोटे, चित्रकार सतीश पिंपळे, गझलकार श्रीकांत कोरान्ने, अशोक ढेरे, अनुराग मिश्र, आनंद जागीरदार, राजश्री देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गेली ४५ वर्षे सुधाकर अंबुसकर संवािदनीवर साथसंगत करत आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळात आमच्यात कधीच बेबनाव झाला नाही. गझलांना सजवण्याचे, काम त्यांनी केल्याचे भीमराव पांचाळे यांनी सांगितले. राजदत्त म्हणाले, प्रत्येक जण जगतो अन् साठी आेलांडतो. मात्र, स्वत: जगण्यासोबतच इतरांना आनंद देणारे फार कमी असतात. सत्काराला उत्तर देताना अंबुसकर म्हणाले, भीमरावजी साेबतचा कारवां शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील. शेळके यांनी अंबुसकरांची स्वरसाधना यापुढेही अशीच सुरू राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सन्मानपत्राचे वाचन अशोक ढेरे यांनी केले, संचालन किशोर बळी यांनी केले. रचना प्रतिभा पवित्रकार, अबोली गद्रे, प्रज्योत देशमुख, सानिका अग्निहोत्री, कीर्ती पिंपळकर, भाग्यश्री पांचाळे यांनी दाद मिळवली. डॉ. देवेंद्र यादव (तबला), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), संदीप कपूर (गिटार), सुधाकर अंबुसकर (संवादिनी) आदींनी रंग भरला.

अंबुसकर षष्ट्यब्दीपूर्ती, गझल सागर प्रतिष्ठान, मुंबई ललित कला अकादमी, अकोल्याचा पुढाकार

गझल मैफिलीने चढवला कळस : नवोदितकलावंतांचे गायन अन् शास्त्रीय समूह वादनाचे फ्युजन अशा उत्तरोत्तर बहरत जाणाऱ्या मैफिलीला कळस चढवण्याचे काम गझलनवाज भीमराव पांचाळेंच्या गझलांनी केले. सरतेशेवटी खास भीमरावांच्या अंदाजातील मराठी गझलांनी अकोलेकरांची तृष्णा भागवली. जुन्या-नव्या गझल ऐकण्यासाठी बाहेरही गर्दी होती.