आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Tukaram Maharaj, Latest News In Divya Marathi

शहरामध्ये जगत्गुरू संत तुकोबारायांचा गजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- संत तुकाराम बीज महोत्सवानिमित्त 18 मार्च रोजी निघालेल्या मिरवणुकीने अकोलेकरांचे लक्ष वेधले. त्यानंतर झालेल्या जाहीर व्याख्यानातून छत्रपती शिवराय व तुकोबारायांचा जीवनपट गजाननदादा शास्त्री पवार यांनी मांडला. कुणबी युवक मंडळ व कुणबी समाज मंडळाच्या वतीने तुकाराम बीज महोत्सवाचे आयोजन झाले. त्यानिमित्त दुपारी 4 ला बागातली देवी येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी सजवलेल्या रथात असलेल्या संत तुकाराम महाराजांचा पुतळा व प्रतिमेचे नारायण गव्हाणकर, डॉ. नवीन तिरुख, वामनराव मानकर, मनोहर शेळके, वासुदेव टिकार आदी मान्यवरांनी पूजन केल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक बागातली देवी येथून तहसील कार्यालय, शहर कोतवाली, गांधी चौक मार्गे स्वराज्य भवनात पोहोचली. मिरवणुकीत अग्रभागी संत तुकोबारायांचा पुतळा व प्रतिमा होती. त्या मागे पाच ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थ्यांनी विविध देखावे साकारले होते. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंगासह छत्रपती शिवराज, मॉ जिजाऊ, शिवबा, संत गजानन महाराज आदी देखावे साकारण्यात आले. चार घोडेस्वार मावळे, पताकाधारी, 50 पेक्षा अधिक गावावरून दाखल झालेले दिंडी पथके, भजनी मंडळे आदींचा लवाजमा होता. धामणगावच्या बँड पथकाने सर्वांचेच लक्ष वेधले. मिरवणूक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. पुण्याचे गजाननदादा पवार यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, छत्रपती शिवराय खर्‍या अर्थाने जाणते राजे होते. त्यांच्या राज्यात कधी शेतकर्‍यांवर संकटे ओढवली नाहीत की कधी आत्महत्या घडल्या नाहीत.
तुकोबारायांसारख्या संतांचे विचार त्यांनी अंगीकारले होते. आज मातृशक्तीने छत्रपतींसारखे शूरवीर, कर्णासारखे दानशूर, तुकोबारायांच्या विचारांना अंगीकारणारे सुपुत्र जन्माला घालावेत. देशाला आतंकवादासारख्या समस्येत लोटणारे पुत्र जन्माला घालण्यापेक्षा वांझ राहिले तरी चालेल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकातून नारायण गव्हाणकर यांनी तुकाराम बीज महोत्सवाच्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्यानंतरही काही त्रुटी राहिल्याचे मान्य करत पुढील वर्षी त्या दूर करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोरे गुरुजी यांनी केले, तर मनोहर शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विठ्ठलराव लोथे, शोभा शेळके, विद्या ठाकरे, कमलाबाई साबळे, वासुदेव टिकार, डॉ. नवीन तिरुख, गजानन वाघोळे, महादेव कौसल, डॉ. मेतकर आदींनी पुढाकार घेतला.
दिंडी पथके, वारकर्‍यांचा गौरव
तुकाराम बीज महोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत 50 पेक्षा अधिक दिंडी पथकांसह भजनी मंडळांनी सहभाग घेत वातावरण भक्तिमय करून टाकले. या सर्व पथकांच्या प्रमुखांना व्यासपीठावर स्थान देऊन त्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विश्वरुपिनी भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, गोमाता भजनी मंडळ, कोटेश्वर महाराज भजनी मंडळ, विठ्ठल-रुख्मिणी भजन मंडळ, भास्कर महाराज भजन मंडळ, सोपीनाथ महाराज भजन मंडळ, जय भवानी, जागेश्वर महाराज भजनी मंडळासह भांबेरी, बोर्डी, हातरुण, व्याळा, उमरी, कौलखेड आदी ठिकाणच्या भजनी मंडळांचा सहभाग होता. व्यासपीठावर साबळे महाराज, आवळे महाराज, आवारे महाराज उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
मिरवणुकीत महापुरुषांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी अकोलेकरांचे लक्ष वेधले. यामध्ये जिजाबाई बनलेली जयर्शी वाकोडे, शिवाजी महाराज साकारणारा शंकर जगताप, संत गजानन महाराज बनलेला अश्विन जगताप, तुकाराम महाराज साकारणारे चंद्रशेखर पांडे, विनोद कवळकार, किशोर गणगे, शिवबा बनलेला आयुष लाड, मावळा शिवचरण बोळे, नामदेव महाराज बनलेला अंकुश लव्हाळे, मुक्ताई अश्विनी पट्टेबहादूर, ज्ञानेश्वरी बनलेली श्रद्धा पवार आदींचा समावेश होता.