आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमण्यांच्या संरक्षणासाठी शंभर घरट्यांचे वितरण; चिमणीचे संरक्षण करण्याचे केले आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चिमण्यांच्या संरक्षणार्थ प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे शुक्रवार, 27 जून रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचारी वर्गाला जवळपास 100 घरट्यांचे वितरण करण्यात आले तसेच चिमणीचे महत्त्व सांगून तिचे संरक्षण करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र काँक्रीटचे जंगल वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक प्राणी तसेच पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. यामध्ये विशेषत: शेतकर्‍यांचा मित्रपक्षी समजल्या जाणार्‍या चिमणीचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. निसर्गाचे चक्र व्यवस्थित ठेवण्यासाठी पक्ष्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पर्यावरणाच्या संवर्धनास हातभार लावणार्‍या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जंगले आणि पाण्याचे नैसर्गिक चक्र सुरळीत सुरू राहण्यासाठी चिमणीचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. चिमण्यांचे संरक्षण तसेच त्यांची संख्या वाढवण्यासाठी सर्वसामान्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पक्ष्यांना वाचवण्यासाठी त्यांना अन्न व पाण्याची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. विशेषत: उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध कार्यालयात जाऊन प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने चिमण्यांचे घरटे भेट देण्यात आली. या मोहिमेंतर्गत एसडीओ प्रा. संजय खडसे, जिल्हा परिषदेचे अधिकारी व न्यायाधीशांना चिमण्यांचे घरटे वितरित करण्यात आले. शहरात शुक्रवारी एकू ण शंभर घरट्यांचे वाटप करण्यात आले. प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने एन. जी. घोंगे, आय. एस. हुसेन, एस. बी. सनगाळे, दीपक सरोदे, शेष सुलतान, आर. यू. कराड, एन. आर. चिपडे, एस. आर. पोहरे, एस. एच. उपाध्ये, जे. एन. आपोतीकर यांनी ही मोहीम राबवली.
अशी आहे घरट्यांची रचना
चिमणीच्या आकारानुसार घरट्याला छिद्र ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चिमणी सहजतेने घरट्यात प्रवेश करू शकते. चिमणीव्यतिरिक्त कोणताही मोठा पक्षी त्यात शिरू शकत नाही. त्यामुळे चिमण्यांचे व त्यांच्या पिलांचे रक्षण होईल. घरट्यांची खोली आवश्यकतेप्रमाणे मर्यादित ठेवण्यात आली आहे. घरट्यात हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. घरट्यामध्ये पाण्याचा शिरकाव झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून घरट्याला ड्रेनेज व्होलदेखील करण्यात आले आहे.
फोटो - विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना घरट्यांचे वितरण केले.