आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवरेपचार रुग्णालयात घुटमळतोय रुग्णांचा जीव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सवरेपचार रुग्णालयातील अनेक वॉर्डांतील शौचालये बंद आहेत, तर काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे रुग्ण पर्याय नसल्याने रुग्णालयातील अनेक पडीत वॉर्डांचा शौचालय म्हणून वापर करत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णालयात रुग्णांचा जीव घुटमळत आहे. एकूणच रुग्णालयातील सोयीसुविधा व स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

सुरुवातीला हे रुग्णालय सार्वजनिक आरोग्य सेवेंतर्गत म्हणजे आरोग्य संचालकांच्या अधिनस्थ होते, मात्र आता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीत सवरेपचार रुग्णालयाचा कारभार चालतो. अधिष्ठाता यांच्या दिमतीला स्वतंत्र यंत्रणाही देण्यात आली. अनुभवी व उच्चशिक्षित डॉक्टरांच्या सेवेचा लाभ रुग्णांना व्हावा, या उदात्त हेतूने हस्तांतरित केलेले रुग्णालय समस्यांचे माहेर घरच बनल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी अस्वच्छता आढळून येते. खिडकीच्या बाहेरील जागेत घाण साचलेली आहे. ही घाण कित्येक वर्षांपासून साफ केली नसल्याने भिंती बाहेरून रंगलेल्या दिसून येतात. जागोजागी थुंकलेले दिसून येते. तर, रुग्णालयातील पाइपलाइन फुटली असल्याने वॉर्डामध्ये सांडपाण्याची दुर्गंधी पसरत आहे.

वैद्यकीय अधीक्षक ‘नो अँन्सर’ : रुग्णालयातील परिस्थितीबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पीआरओ डॉ. दिलीप सराटे
यांच्याशी बोलण्याचे सांगत वेळ मारून नेली.

डॉक्टरच औषधीबाबत अनभिज्ञ : अस्थिव्यंग विभाग, गुप्तरोग विभाग, नेत्र विभाग, जनरल वॉर्डातील डॉक्टर रुग्णांना जी औषधी चिठ्ठीवर लिहून देतात. ती रुग्णालयातील वितरण विभागामध्ये उपलब्ध नसते. ऑन ड्युटी डॉक्टरच आपल्या रुग्णालयात कोणती औषध उपलब्ध आहे, याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
अनेक वॉर्डांतील शौचालये बं
रुग्णालयातील अनेक वॉर्डांतील शौचालये बंद स्थितीत आढळून आलेत. यामध्ये प्रामुख्याने पुरुष वैद्यकीय कक्ष क्रमांक 6, औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अखत्यारीतील स्त्रीरोग निदान कक्ष क्रमांक 7, याशिवाय 10, 11 व 12 क्रमांकाच्या वॉर्डामधील शौचालये बंद होती.

पाइपलाइन फुटली, पाणी वॉर्डात
अतिदक्षता विभागासह वॉर्ड क्रमांक 5, 6 व 12 दुर्गंधीच्या विळख्यात सापडला आहे. वॉर्डाच्या परिसरामध्ये उरलेले अन्न, बायोमेडिकल वेस्ट आदी फेकलेले दिसून येते. पाइपलाइन फुटली असल्याने नालीतील पाणी वॉर्डात शिरत आहे. साचलेल्या चिखलाने घाण वास येत आहे.

सिटी स्कॅन, सोनोग्राफीसाठी विलंब
सिटी स्कॅन व सोनोग्राफी करण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा विलंब लागतो. या ठिकाणी केवळ दोनच डॉक्टर कार्यरत असल्याने रुग्णांना तपासणीसाठी प्रतीक्षा करावी लागते. कितीही अर्जंट असले तरी कर्मचारी रुग्णाला दिलेल्या नियोजित तारखेलाच या, असा सल्ला दिला जातो.
दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावावा लागतो.
पडीत वॉर्डातून दुर्गंधीचा त्रास :
रुग्णालयातील अनेक वॉर्डांतील शौचालये बंद आहेत, तर काही नादुरुस्त आहेत. त्यामुळे वॉर्डाच्या बाजूला असलेल्या पडीत वॉर्डालाच शौचालय बनवल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे बाहेरील दुर्गंधीचा रुग्णांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. पाच ते सहा वॉर्डांच्या बाहेरील अशी परिस्थिती असताना स्वच्छता करण्याकडे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.