आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपासून रखडली शाळांची प्रतिपूर्तीची रक्कम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दुर्बल वंचित घटकातील बालकांना चांगले, दर्जेदार सुविधेचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई अ‍ॅक्ट) जिल्ह्यात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांना या मोफत प्रवेशाच्या मोबदल्यात प्रतिपूर्ती रक्कम दिली जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, मागील तीन वर्षांपासूनची ही रक्कम शाळांना मिळालीच नाही. त्यामुळे २५ टक्के मोफत प्रवेश राबवणार्‍या शाळांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात मोफत प्रवेश प्रक्रिया राबवणार्‍या तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण २७३ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण विद्यार्थी संख्या तीन लाख २३ हजार अशी आहे. २५ टक्क्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यात सुमारे ७५ हजार जागा आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या जागेवर दुर्बल वंचित घटकातील बालकांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यत मोफत सक्तीचे शिक्षण मिळणार आहे. या मोबदल्यात संस्थांना शासनाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बदल्यात प्रतिपूर्तीची रक्कम दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही रक्कम दरवर्षी ठरवण्यात येते. आश्वासनानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळांनी ही प्रक्रिया राबवली आहे. मागील तीन वर्षांपासून ही प्रक्रिया जिल्ह्यात राबवण्यात येत आहे, मात्र रक्कम अद्यापही मिळण्याचे संकेत दिसत नसल्याने शिक्षण संस्थाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दोन वेळा मिळणार होती रक्कम
प्रतिपूर्तीची रक्कम ही संबंधित शाळांना वर्षातून दोन टप्प्यात प्रदान केली जाणार होती. यामध्ये माहितीची पडताळणी केल्यावर आणि अधिनियमाच्या तरतुदीस अधीन राहून शिक्षणाधिकारी ही रक्कम ३० अॉक्टोबरनंतर पहिला हप्ता देणार होते, तर शैक्षणिक वर्षाच्या ३० एप्रिलनंतर किंवा शैक्षणिक वर्ष समाप्तीनंतर यापैकी जे नंतर येईल, त्यावेळी हा दुसरा हप्ता देण्यात येणार होता.

वाटपाबाबत सूचना नाही
राज्याच्याशिक्षण विभागाच्या वतीने शाळांच्या प्रतिपूर्तीची ही रक्कम पाठवण्यात आली तर ती वितरीत कशी करावयाची, या संदर्भात कोणत्याही सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या नाहीत. शाळेची रक्कम थेट मुख्याध्यापकांच्या नावी ऑनलाईन पाठवण्यात येईल की जिल्हास्तरावर याचे वाटप होईल याबाबत अद्यापही संभ्रम कायमच आहे.

पाठपुरावा सुरू आहे
प्रतिपूर्तीची रक्कम मागील तीन वर्षांपासून रखडली आहे. जिल्ह्यातील शाळा आम्हाला यासंदर्भात वारंवार माहिती विचारत आहे. ही बाब आम्ही वरिष्ठस्तरावर देखील कळवली आहे. ही रक्कम शाळांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मदनआंधळे, प्राथमिकउप शिक्षणाधिकारी, बुलडाणा