आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळांवर आता कारवाईचा बडगा, 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती भोवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्यात पटपडताळणीचा गवगवा झाला; मात्र पटपडताळणीत दोषी आढळलेल्या शाळांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता शालेय शिक्षण विभागाने पटपडताळणीतील दोषी शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षक आमदारांसोबत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली.

राज्यातील ग्रामीण भागांमध्ये असलेल्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती हा सगळ्यांच्या चिंतेचा विषय बनला आह़े राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 50 टक्क्यांहून कमी उपस्थिती असणार्‍या शाळांची मान्यता रद्द करून त्यांना टाळे लावण्याचा मुद्दा शालेय शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आह़े राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पटपडताळणीत अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती दिसून आली़ यामुळे अशा सर्व शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने लवकरच घेतला जाणार आह़े राज्यात अनुदानाला पात्र शाळांचे मूल्यांकन करण्यात आल़े त्यांपैकी पात्र ठरलेल्या शाळांना तातडीने शासनाकडून अनुदान उपलब्ध करण्यात येणार आह़े यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नुकतेच आदेशही जाहीर करण्यात आले आहेत़ या प्रकरणात शासनाच्यावतीने काय कारवाई करण्यात येते याकडे लक्ष लागले आहे.

आगाऊ वेतनवाढ
राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, त्यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आता एकप्रकारे ‘आर्थिक सन्मान’ही लाभणार आहे.

इतरत्र समायोजन
पटपडताळणीत 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती आढळलेल्या या शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांना सेवेतून काढण्याऐवजी इतर शाळांमध्ये त्यांचा समावेश केला जाणार आह़े. यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांवर अन्याय होणार नाही
पटपडताळणीत 50 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असला तरी, शाळेच्या कुठल्याही कर्मचार्‍यावर अन्याय होणार नाही. शिक्षक व इतर कर्मचार्‍यांचे समायोजन करण्यात येईल.’’ वसंतराव खोटरे, शिक्षक आमदार, अमरावती विभाग