चिखली - तालुक्यात शिक्षण विभागाच्या वतीने 30 सप्टेंबर 2012 च्या प्रत्यक्ष पट पडताळणीनुसार 22 शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दीडशेच्या आत आढळून आल्याने जवळपास 22 उच्च श्रेणी मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे आता या मुख्याधापकांना रिक्त पदांवर नियुक्ती होण्यासाठी अधिकारी-पदाधिकार्यांची मनधरणी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत या मुख्याध्यापकांवर भटकंती करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाने या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळेला पाचव्या वर्गाची मान्यता दिली आणि इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळेला आठवीपर्यंतची मान्यता दिली आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने 30 सप्टेंबर 2012 च्या प्रत्यक्ष पटपडताळणीनुसार सर्वेक्षण करुन दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची यादी बनवून त्यांना अतिरिक्त ठरवले आहे. या अतिरिक्त मुख्याध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया सुरु असून, लवकर त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे होते ‘स्थलांतर’
जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत असल्याने पालक आपल्या पाल्यांना खासगी शाळेत टाकत आहेत. या शाळांमध्ये उच्च् दर्जाचे शिक्षण मिळत नसल्याची ओरड पालक करत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यायला हवे.
अधिकार्यांची करावी लागते मनधरणी
जिल्ह्यात ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे, ती जागा आपणास जवळची किंवा योग्य असल्यास त्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी काही मुख्याध्यापक धावपळ करत आहेत. सोयीची जागा मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकार्या ची मनधरणी करावी लागत आहे.
अतिरिक्त ठरलेल्यांमध्ये यांचा समावेश
अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांमध्ये शिवाजी पुुंजाजी कांबळे (सोनेवाडी), शंकर मोतीराम चव्हाण (किन्ही सवडद), बाळकृष्ण वामनराव तांबोळे (माळशेंबा), हनुमान बंकेलाल शर्मा (मुरादपूर), सिद्धेश्वर श्रीराम परिहार (रोहडा), सुभद्रा पुंडलिक राजपूत (शेलगाव), दिलीप पुंडलिक खेडेकर (मनुबाई), रामदास हरी उबरहंडे, दिनकर गोपाळ पडघान (कवठळ), हरिदास विठोबा कापले (करणखेड), नारायण बाळकृष्ण सोळंकी (बोराळा), अर्जुन जनार्धन अंभोरे (डोंगरगाव), विश्वासराव अच्युतराव कोल्हे (घोडप), मंदाकिनी भीमराव कस्तुरे (अंबाशी), पुष्पा सखाराम धंदर (उत्रदा), नारायण विश्वनाथ हाकके (अंत्रीकोळी), गोविंदा बारीकराव चनवटे (सोमठाणा), अनिल त्रंबक गवई (खोर), गुणाजी जगन्नाथ बळी (चंदनपूर), भिका धोंडूबा केवट (पांढरदेव), शिवगीर पुंडलिक भुतेकर (शेलोडी), विलास त्रंबक गायकवाड (टाकरखेड) यांचा समावेश आहे.