आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा स्पर्धा: स्नेहा, रूपेश, सौरभ, शैलेश आणि अत्ताउल्लाह विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला असून, 7 ऑगस्टला तर एकाच दिवशी दोन क्रीडा स्पर्धांचे आयोजन असल्याने वातावरण क्रीडामय होते. वसंत देसाई क्रीडांगणावरील बहुउद्देशीय सभागृहात जिम्नॅस्टिक तर लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर वेटलिफ्टिंग स्पर्धा झाली. स्नेहा पचोरी, रूपेश पचोरी, सौरभ निंबाळकर, सैयद अत्ताउल्लाह, शैलेश मोहोळ, धीरज धानोकार यांनी दिवस गाजवला.

सकाळी 11 वाजता वसंत देसाई क्रीडांगणावरील बहुउद्देशीय सभागृहात जिम्नॅस्टिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मुकेश तुंडलायत, धीरेंद्र सोमवंशी उपस्थित होते. स्पर्धेत शहरातील 20 शाळांच्या 50 वर खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 14 वर्षे वयोगटात 40, 17 वर्ष वयोगटात 15 तर 19 वर्ष वयोगटात 19 खेळाडू होते. स्पर्धेचे पंच म्हणून मुकेश तुंडलायत, रूपेश पचोरी, अभिषेक लोखंडे यांनी काम पाहिले.

वेटलिफ्टिंग स्पर्धा
लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर दुपारी जिल्हा शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. या वेळी वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव सुशील मोहोड, संतोष पंजवानी, डी. एम. देशमुख, क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी पूजनानंतर र्शीफळ फोडून स्पर्धेचे रीतसर उद्घाटन केले. त्यानंतर उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत 50 किलो वजनगटात शैलेश मोहोळ, 56 किलोगटात सैयद अत्ताउल्लाह आणि 69 किलो वजनगटात धीरज धनोकार विजयी ठरले. पंच म्हणून सुशील मोहोड, संतोष पंजवानी, पंकज कांबळे, दिव्यांशू जयसिंगपुरे यांनी काम पाहिले.

अवघ्या 11 वर्षांच्या स्नेहा पचोरीने जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारत रबर डॉलचे बिरूद मिळवले आहे. चार वर्षांपासून जिम्नॅस्टिकचा सराव करणारी स्नेहा वर्गातही दरवर्षी प्रथम असते. मोठा भाऊ रूपेश पचौरीही राष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू असून, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिचा प्रवास सुरू आहे.

जुने शहरातील श्याम पचोरी यांचे चिरंजीव रूपेश पचौरीने जिम्नॅस्टिकच्या सरावाला नऊ वर्षांपूर्वी सुरुवात करून चांगले यश मिळवले. जिल्हा, राज्य असा प्रवास करत तो राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. एवढेच नव्हे तर सोलापूर येथे जिम्नॅस्टिक फेडरेशनमार्फत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचाच कित्ता गिरवत चार वर्षांपूर्वी स्नेहा जिम्नॅस्टिककडे वळली. जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव व प्रशिक्षक मुकेश तुंडलायत यांच्याकडे तिने धडे गिरवले. जिल्हा, राज्य स्पर्धा गाजवत तिने राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला. राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे तिचे स्वप्न आहे. दररोज दोन ते तीन तास जिम्नॅस्टिकचा सराव करणारी स्नेहा अभ्यासातही तेवढीच तरबेज आहे. मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी स्नेहा दरवर्षी आपल्या वर्गातून पहिली येते. तिला नृत्याची आवड आहे. भविष्यात उत्कृष्ट जिम्नॅस्टिकपटू म्हणून तिला नावलौकिक मिळवायचा आहे.