आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलला शाळेचा पहिला दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांचा परिसर गुरुवार, 26 जून रोजी विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजून गेला. सर्वत्र किलकार्‍या, रडण्याचे, ओरडण्याचे, हसण्याचे आवाज येत होते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांच्या वतीने दमदाटी तर काही ठिकाणी खाऊचे आमिष दाखवून बालकांना शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात येत असल्याचे चित्र होते, तर दुसरीकडे गुरुजन वर्ग फूल घेऊन विद्यार्थ्यांच्या स्वागतास सज्ज होते.
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांचे प्रवेशद्वार आज सकाळीच उघडण्यात आले. शाळा साफसफाई करून दोन दिवस आधीच चकचकीत करण्यात आल्या होत्या. आज जिल्ह्यात हजारो नवीन विद्यार्थ्यांनी शाळेत पाऊल ठेवले. या वेळी शहरातील बाल शिवाजी, शारदा कॉन्व्हेंट, प्रबोधन विद्यालय, भारत विद्यालय, एडेड हायस्कूल, विवेकानंद गुरुकुंज, नगरपालिका प्राथमिक, महात्मा फुले प्राथमिक, रामरक्षा शाळा, शिवाजी विद्यालय आदींच्या वतीने देशभक्तीपर गीते लावून बालकांचे स्वागत करण्यात आले.

शाळेच्या प्रवेशद्वारात येताच गुरुजनांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शाळा गुरुवारी सुरू होणार असल्याने पालक वर्गाने बुधवारीच आपल्या पाल्याच्या तयारीसाठी जोरदार खरेदी केली. आज सर्व विद्यार्थी आपआपल्या तयारीने शाळेत अवतरले. एरवी शांत वाटणारे शाळेचे परिसर आज आॅटो, दुचाकी, सायकल, चारचाकी वाहनांनी गच्च होते. शाळेचा पहिला दिवस असल्याने काही विद्यार्थी आपल्या आईवडिलांना सोडण्यास तयार नसल्याने आई, आजोबा यांनादेखील वर्गात बसावे लागले. नगरपालिकेच्या शाळांत विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्याने पोषण आहारासोबत गोड खाऊ देण्यात आले. दरम्यान, शहरातील भारत शाळेसह अन्य काही शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या वेळी बालकांच्या ओरडण्याने शाळा पुन्हा लेकुरवाळ्या झाल्याचे दिसून आले.

आई, आजोबांना बसावे लागले वर्गात
आज शाळेचा पहिला दिवस असल्याने नव्याने वर्गात आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व काही नवे-नवे दिसत असल्याने हे विद्यार्थी अक्षरश: गांगरून गेले होते, घाबरले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत आई, आजी, आजोबा यांनादेखील वर्गात बसावे लागले. आजोबांनीदेखील पहिलीचा पाठ आज गिरवल्याचे दिसून आले.
सव्वातीन लाख विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेचा पहिला दिवस असल्याने आज जवळपास सर्वच विद्यार्थी शाळेत पोहोचले. शिक्षण विभागाच्या वतीने यंदा तीन लाख 33 हजार 78 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावी यासाठी नियोजन करण्यात आले होते. यात मराठी माध्यमचे दोन लाख 84 हजार 878, उर्दू माध्यमचे 46 हजार 399, हिंदी माध्यमचे 636, इंग्रजी माध्यमचे 1165 विद्यार्थी आहेत. या अनुषंगाने आज सव्वातीन लाख विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
(फोटो - सुटीनंतर शाळा गुरुवारी पुन्हा सुरू झाल्या. त्या वेळी लहान पाल्यांसोबत आलेल्या पालकांनी शाळांपुढे अशी गर्दी केली होती)