आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणवेश खरेदीत लाखो रुपयांची उलाढाल; खरेदीसाठी बाजारात पालकांची झुंबड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - उन्हाळी सुटीनंतर जिल्ह्यातील शाळांना आज गुरुवारपासून सुुरुवात झाली. शाळा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच गणवेश खरेदीसाठी दुकानांवर गर्दी वाढत आहे. लाखो रुपयांची उलाढाल गणवेश खरेदीतून झाली आहे. एकाच वेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असल्याने बाजारातही गणवेशांची टंचाई जाणवत आहे, त्यामुळे अनेकांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तालुक्यात 65 ग्रामपंचायती असून, जवळपास बुलडाणाशी संपर्क असणार्‍या 30 गावातील शाळांच्या गणवेश खरेदीसाठी पालक शहरात येत आहेत. प्रत्येक शहराच्या ठिकाणी हीच अवस्था आहे. काही शाळा स्वत:च गणवेश विद्यार्थ्यांना वाटप करतात, तर इतर शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील दुकानांमध्ये गणवेश खरेदीची गर्दी उसळते. बुलडाणा शहरात वर्षभर फक्त शालेय गणवेशाचीच विक्री करणारी काही दुकाने आहेत. या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गणवेशाची उलाढाल होते. त्या मानाने दुसर्‍या दुकानांमध्ये शालेय गणवेशांव्यतिरिक्त इतरही कपडे विक्री होत असल्याने त्यामध्ये खास उलाढाल होत नाही. शाळा, महाविद्यालये, कॉन्व्हेंटची संख्या वाढल्याने जवळपास दीडशे प्रकारचे गणवेश सध्या विक्रीस आले आहेत. मुलींच्या ड्रेसमध्ये ओढणी मोफत द्यावी लागत आहे.
गणवेशाच्या किमतीत 15 टक्के वाढ
शालेय गणवेशाच्या दरामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात अजूनही पुरेसे गणवेश उपलब्ध झालेले नाही. परंतु, बाजारातील कपड्यांचे वाढते दर, शिलाई लक्षात घेऊन तयार गणवेश हे महागणार आहेत. कापड घेऊन शिवले तरी ते महागातच पडणार आहेत. यामध्ये ग्राहकही काही करू शकत नाही. कारण गणवेश खरेदी करणे पालकांची मजबुरी असते.

शालेय साहित्यात 20 टक्के वाढ
या वर्षी शालेय साहित्याच्या दरात 20 टक्के वाढ झाली आहे. नामांकित कंपनीच्या वह्याही आता महाग मिळणार आहे. क्लासिक्स, नवनीत व सुंदरम अशा कंपनीच्या वह्यांचा खप असतो. त्यासुद्धा महागल्या आहेत. कंपास व पेनही महागला आहे.
शहरातील शाळांमधील गणवेश
एडेड हायस्कूल स्काऊट शर्ट निळी पँट किंमत 500 ते 600 रुपये
भारत विद्यालय स्काऊट शर्ट निळी पँट किंमत 550 रुपये
शारदा कॉन्व्हेंट नर्सरी लाल पिवळे शर्ट पिवळी पँट किंमत 300 ते 350
शारदा कॉन्व्हेंट 1 ते 12 एअर फोर्स शर्ट चौकडीची पँट किंमत 400 ते 600 रुपये
शिवाजी विद्यालय फुलपँट मिलिटरी कलर चौकडीचे शर्ट किंमत 400 ते 500 रुपये
गांधी शाळा लाल हापपँट पांढरे शर्ट किंमत 200 ते 300 रुपये
प्रबोधन विद्यालय बिस्कीट कलर शर्ट व मिलिटरी कलर पँट किंमत 350 ते 500 रुपये
रुखाई कन्या विद्यालय ब्लू चेकचे शर्ट ओढणीसह 350 ते 450 रुपये
सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल ग्रे चेक्स शर्ट व फु लपँट किंमत 300 ते 350 व 500 ते 600 हायस्कूलसाठी असे विविध शाळेच्या गणवेशाचे दर आहेत.
गणवेशासाठी प्रतीक्षा
गणवेशाची खरेदी या वर्षी अपेक्षेपेक्षा वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सकाळी आणलेला माल संध्याकाळी संपत आहे. दररोज ग्राहकांना नंबराप्रमाणे उभे करून गणवेश दिल्या जात आहे. शिस्तीत गणवेश वाटप सुरू आहे. या वेळी प्रथमच गणवेशासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.’’
दिलीप कोठारी, गणवेश विक्रेता

(फोटो - गणवेश खरेदीसाठी दुकानात उडालेली झुंबड.)