आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा होतोय छळ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- व्हॅन व ऑटोंमध्ये कोंबून शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक शहरात सर्रास सुरू आहे. याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. अकोल्यात शनिवारी एका व्हॅनचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यामुळे व्हॅन व ऑटोरिक्षांतून विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक अत्यंत धोकादायक व विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक छळाला चालना देणारी असल्याचे समोर आले आहे. स्कूल बसेसचे नियम जास्तीत जास्त कडक करण्यात येत असले तरी, व्हॅन व ऑटोरिक्षांतून होणार्‍या विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीकडे सपशेल डोळेझाक केली जात आह़े

अकोल्यात इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढल्यानंतर आणि शहराचा विस्तारही वाढल्याने मागील पाच-सात वर्षांत विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचा आणि शाळा सुटल्यानंतर परत आणण्याचा प्रश्‍न निर्माण झाला़ प्रारंभी ऑटोमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली़ एका ऑटोत दहा-पंधरा विद्यार्थी प्राण्यांप्रमाणे कोंबले जाऊ लागल़े त्यानंतर या व्यवसायात चांगला पैसा मिळू लागल्याने काही जणांनी व्हॅन खरेदी केल्या़ तुलनेने सुरक्षित प्रवास म्हणून पालक आपल्या पाल्यांना व्हॅनद्वारे शाळेत पाठवू लागले आहेत. शहरातील बहुतेक शाळांकडे स्कूल बस नाही. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात चिमुकल्या विद्यार्थ्यांना व्हॅन व ऑटोशिवाय पर्याय नाही़ व्हॅनमध्येही असुरक्षित वाहतूक असल्याचे स्पष्ट निदर्शनात येते. स्कूल व्हॅनमध्येही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबल्या जातात. विद्यार्थ्यांची हात-पाय तसेच दप्तरे वाहनाच्या बाहेर निघालेली दिसतात़ विद्यार्थ्यांना वाहनात नीट हालचालीही करता येत नाही़ बरेचदा वाहनचालकांच्या शेजारी विद्यार्थ्यांना बसवलेले दिसत़े अनेक व्हॅनला जाळी लागलेली नाही. विद्यार्थी व्हॅनच्या खिडकीतून बाहेर डोकावतात. व्हॅनच्या दरवाज्यांची वारंवार जोरदार उघड-बंद करण्यात येत असल्याने त्यामध्ये विद्यार्थ्यांची बोटे चेंदून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच व्हॅन व ऑटोचालकाकडे अनेक शाळांचे व वेगवेगळ्या ठिकाणांचे विद्यार्थी असल्याने वेळ साधताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे ऑटो व व्हॅनचे चालक आपला राग विद्यार्थ्यांंवर काढण्याचे प्रकारही घडतात. वेळप्रसंगी चालकांकडून विद्यार्थ्यांंना दमदाटी व मारहाणही होते. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांंच्या मानसिकतेवर होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

मारुती व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी नाहीच़ तरीही त्यात विद्यार्थ्यांची ने-आण होत असल्याचे दृश्य शाळांसमोर रोजच दिसत़े विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवलेले असत़े शहरात अशा शंभरहून अधिक व्हॅन्स चालतात, ही माहिती असूनही वाहतूक पोलिस गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.


कारवाई नगण्य : मारुती व्हॅन व ऑटोरिक्षातून र्मयादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक सर्रास सुरूच असून, वाहतूक पोलिसांची कारवाई मात्र नगण्य आहे.
पालकांची धावपळ विद्यार्थ्यांच्या जीवावर : मराठी शाळांचेही विद्यार्थी स्कूल व्हॅन व ऑटोने शाळेत जात असले तरी, इंग्रजी शाळांत हे प्रमाण प्रचंड आह़े अनेक कुटुंबांत पती-पत्नी दोघेही नोकरी करतात त्यांची धावपळ वर्णनापलीकडची आहे. शाळांच्या बस नसल्याने चिमुकल्यांना व्हॅन किंवा ऑटोने पाठवावे लागते.

मोठय़ा शहरातील भंगार व्हॅन अकोल्यात
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी मोठय़ा शहरातील भंगारात निघालेल्या व्हॅन अकोल्यात आणण्यात येत आहे. या व्हॅनमधून बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलिंडरचाच वापर करत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. या बेकायदा व धोकादायक वाहतुकीविरोधात आजपर्यंत कारवाई झाली नाही़ परंतु, भंगारात निघालेल्या या वाहनांना बाद करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना आजपर्यंत जाग आली नाही, हे विशेष आहे.

नियमांना तिलांजली
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन सीटर ऑटोमध्ये तीनपेक्षा अधिक आणि मोठय़ा सहा आसनी ऑटोमध्ये सहापेक्षा अधिक विद्यार्थी नेण्याची परवानगी नसतानाही हा नियम धाब्यावर बसवून अनेक तीन सीटर ऑटोचालक 12 ते 15 विद्यार्थी ऑटोत कोंबतात. सर्वोच्च् न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून अवैध वाहतूक करतात.

रॉकेलचा वापर
भंगारात निघालेल्या ऑटोमधून इंधन म्हणून रॉकेलचा वापर करत धोकादायक वाहनांतून शालेय विद्यार्थ्यांची बिनधास्तपणे वाहतूक सुरू केली आहे. जुनाट व मोडकळीस निघालेल्या ऑटो व कालबाह्य व्हॅनमधून गुरा-ढोरांप्रमाणे विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केल्या जाते. ही वाहने प्रदूषणासह अन्य प्रश्‍न निर्माण करत आहेत.

1) शहरात शेकडो शाळा असतानाही स्कूल बसची संख्या नगण्य आहे.
2) ऑटोमध्ये अशा प्रकारे शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होते.
3) नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची खासगी व्हॅनमधून वाहतूक केली जात आहे.