आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञान मेळावा: विद्यार्थ्यांनी सहा मिनिटांत मांडले पाण्याचे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- तालुका विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात शहरी विभागात स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या महिता पांडेने तर ग्रामीण विभागात गाडगेबाबा विद्यालय, दहीगाव (गावंडे)च्या किरण गावंडेने बाजी मारली. त्यांची जिल्हास्तरावर वर्णी लागली आहे. पाणी हेच जीवन असून, आज पाणी मुबलक उपलब्ध असले तरी भविष्यासाठी पाण्याचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचा सूर उमटला.

अकोला तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 6 ऑगस्टला प्राजक्ता कन्या विद्यालय, कौलखेड येथे झाला. या वेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘जलसहयोग मुद्दे व आव्हान’ हा विषय अवघ्या सहा मिनिटांमध्ये प्रभावीपणे मांडला. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी पी. के. देशमुख अध्यक्षस्थानी होते. गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे, विज्ञान मंडळाचे रवींद्र भास्कर, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार, प्राचार्य सागर देशमुख, विज्ञान मंडळाचे शहर अध्यक्ष अनिल मसने आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिल मसने यांनी केले. या वेळी रवींद्र भास्कर यांनी विद्यार्थ्यांना सादरीकरणाबाबत उपयुक्त माहिती दिली, तर अरुण शेगोकार, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे, सागर देशमुख आदींची समयोचित भाषणे झाली. पी. के. देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात अशा उपक्रमांमध्ये मनापासून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपला सर्वांगीण विकास साधावा तसेच विज्ञानाचा बाऊ करण्याऐवजी दैनंदिन जीवनातील विज्ञान समजून घेण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यात प्रत्येक शाळेतून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमधून एकच विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. त्यानुसार मेळाव्यात ग्रामीणमधून आठ तर शहरी भागांतून 23 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रत्येकाला भाषणासाठी सहा मिनिटे वेळ देण्यात आला. मेळाव्याचा विषय जलसहयोग-मुद्दे व आव्हान हा होता.

भाषण संपताच परीक्षकांनी भाषणाच्या विषयावर तीन प्रश्न विचारले. स्पर्धकांसाठी प्रस्तुतीकरणातील वैज्ञानिक माहितीस 40 गुण, भाषणाचा ओघ 25 गुण, लेखी आशय क्षमता चाचणी दहा गुण, भाषणानंतर तोंडी विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी दहा गुण नाविन्यपूर्ण दृकसाहित्य वापरासाठी 15 गुण असे एकूण 100 गुण होते. परीक्षक म्हणून प्रा. यादव वक्टे, व्ही. बी. भिसे, शैलजा अंधारे, एस. बी. धन्नासरे यांनी काम पाहिले. स्पर्धेत शहर व ग्रामीण गटातून प्रत्येकी प्रथम व द्वितीय आलेले विद्यार्थी लवकरच होणार्‍या जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात सादरीकरण करतील. त्यांनी विजयाने हूरळून न जाता येणार्‍या स्पर्धेसाठी अधिक जोमाने कामाला लागावे, असा सल्ला परीक्षकांनी या वेळी दिला.

असे करावे सादरीकरण
विद्यार्थ्यांनी अवघ्या सहा मिनीटांत मांडणी करायची आहे. त्यामध्ये निरनिराळे फलक, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करायचा आहे. तो करताना तालुका, जिल्हास्तरावर थोडीशी असुविधा झाली तर चालून जाते. मात्र राज्य, राष्ट्रीयस्तरावर छोटीशी चुकही खपवून घेतली जात नाही. त्यामुळे आपण सादरीकरणासाठी केलेले साहित्य एकट्याने सहज वापरता येईल का? कुठल्या अडचणी येवू शकतात? याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भास्कर यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करताना सांगितले.

असे आहे पुढील नियोजन
अखिल भारतीय विद्यार्थी मेळाव्याचे पुढील नियोजनानुसार मूर्तिजापूर तालुका 7 ऑगस्टला व्यंकटेश बालाजी कॉन्व्हेंट, पातूर तालुका 8 ऑगस्टला तुळसाबाई कावल विद्यालय, अकोट तालुका 10 ऑगस्टला सेंटपॉल इंग्लिश स्कूल, तेल्हारा 12 ऑगस्टला स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट, बार्शीटाकळी तालुका 13 ऑगस्टला बाबासाहेब धाबेकर विद्यालयात तर बाळापूर तालुका विज्ञान प्रदर्शन 16 ऑगस्टला धनाबाई विद्यालय, बाळापूर येथे होईल. या प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.