आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उदासीनता: सुरक्षा रक्षक पदभरती चौकशी थंडबस्त्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रंग अंधत्व असलेल्या चालकांना सुरक्षा रक्षक पदावर भरती करण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीची चौकशी थंडबस्त्यातच आहे. अनेक गैरप्रकार महामंडळामध्ये घडत असताना चौकशीचा फार्स करून अनेक प्रकरणे रफादफा करण्यात येत असल्यानेच एसटी आणखीच तोट्यात जात आहे.
एसटी महामंडळामध्ये रंग अंधत्व आलेल्या चालकांना सुरक्षा रक्षक पदावर सामावून घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. २० जून २०१२ च्या निर्णयान्वये अकोला विभागीय कार्यालयांतर्गत अशा चालकांना सुरक्षा रक्षक पदावर सामावून घेण्याबाबतची प्रक्रिया राबवली. चालकपदावर काम करण्याच्या कामाला कंटाळलेल्या अनेकांना या निर्णयामुळे आधार मिळाला.
शिवाय, काही जणांनी डॉक्टरांच्या संगनमताने रंग अंधत्व आलेल्या जवळपास २० चालकांना सुरक्षा रक्षक पदाची जबाबदारी दिली. याबाबत कर्मचारी संघटनेने वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केलेली आहे. धुळे येथील अशाच प्रकारच्या तक्रारीनंतर मोठा पर्दाफाश झाला होता. अकोला येथील प्रकरणाची मात्र चौकशीच सुरू आहे.
महामंडळ दरवर्षी तोट्यात चालले आहे. यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, एसटीचे अधिकारी कर्मचारी आपण किती काम करतो, याचा आव आणत आहेत. शिवाय, एसटीमध्ये गैरप्रकार केल्यानंतर शिक्षेचे प्रावधान खूपच कमी आहे. त्यामुळे याविरोधात महामंडळाच्या सुरक्षा दक्षता विभागाने कंबर कसली असून, आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील प्रक्रियाही आखण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार रंग अंधत्व आलेल्या चालकांना सुरक्षा रक्षकपदी सामावण्याच्या निर्णयाचा खेळखंडोबा झाला असून, आर्थिक मलिदाही मोठ्या प्रमाणावर लाटण्यात आला. तक्रारी दाखल झाल्यानंतर चौकशी सुरू झाली.
परिणामी, ज्या चालकांनी या गैरप्रकारातून सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवली, त्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, चौकशी संथपणे सुरू असून, सत्य समोर येत नसल्याने असे गैरप्रकार करणाऱ्यांची हिंमत वाढत आहे.
चौकशीचे भिजत घोंगडे
- सदर प्रकारामध्ये नियमबाह्यपणे काम झाल्यास सत्य समोर येणार आहे. मात्र नि:पक्षपातीपणे चौकशी होऊन, मुख्य सुरक्षा दक्षता विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या सुरक्षा रक्षक पदाच्या भरतीची चौकशी इतर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची आवश्यकता आहे. शिवाय ज्याने काहीच केले नाही, त्याला कशाचाच डर नसतो. मात्र,चौकशीचे २-३ वर्षांपासून भिजत घोंगडे असून, या प्रकरणी त्वरित चौकशी पूर्ण झाल्यास सत्य समोर येईल आणि ज्याने काहीच केलेले नाही, त्यांना शांततेची झोपसुद्धा सुखाने घेता येईल.''
अविनाश जहाँगीरदार, विभागीय सचिव, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना