आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोयाबीनचा माल जप्त, बीज माफियांचा पोलिसांकडून शोध सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- महाराष्ट्रात बियाणे तयार करून कर्नाटकात विक्री करण्याचा प्रयत्‍न करणार्‍या दुर्गा इंडस्ट्रीजवर छापा टाकून 37 लाख रूपयांचा सोयाबीनचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून पोलिसांनी बिजमाफीयांचा शोध सुरू केला आहे. तर बनावट बियाण्याचा शोध घेण्यासाठी कृषी केंद्राची झाडाझडती घेणे सुरू झाल्याने जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
अकोट-हिवरखेड मार्गावरील दुर्गा इंडस्ट्रिजमध्ये सोयाबीनचे बनावट बियाणे पॅकिंग होत असल्याची माहिती अकोल्याच्या कृषी यंत्रणेला मिळाली. त्यांनी 19 जून रोजी दुपारी तेथे छापा घातला असता, सोयाबीनचा साठा आढळून आला. स्थानिक बाजारातून सोयाबीन विकत घेऊन त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सोयाबीन इंडो अँग्रो जेनेटिक्स सीड्स देवास (मध्य प्रदेश) या कंपनीच्या पिशवीत भरण्यात येत होते. प्रत्येकी 30 किलो ग्रॅमची बियाण्याची पिशवी आहे. या प्रत्येक पिशवीची किंमत तब्बल 2700 रुपये आहे. खुल्या बाजारात विकत घेतलेल्या या सोयाबीनवर कोणतीही प्रक्रिया न करता ते सोयाबीन उत्तम प्रतीचे बियाणे म्हणून कर्नाटक प्रांतात विक्रीसाठी नेण्यात येत होते. याप्रकरणी गिरीश विष्णुपंत नानोटी जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या तक्रारीवरून बजरंग मंगलचंद अग्रवाल, रा. तालीकोटी, ता. मुद्दे बिहार, जि. विजापूर, कर्नाटक, कैलाससिंग, एन. एम. गोगुलवार, बीज प्रमाणीकरण यंत्रणा, मध्य प्रदेश भोपाळचे संचालक इंडो अँग्रो जेनेटिक्स सीड देवासचे संचालक, अकोटच्या दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिजचे संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भादंविच्या 420, 34 जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम 3, 6, बियाणे कायदा 1966 च्या कलम 6, 7, 17 बियाणे 1971 च्या कलम 38, बियाणे नियंत्रण आदेश 1983 च्या कलम 3, 8, 9, 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 जूनपर्यंत पोलिस कोठडी
बियाणे साठेबाजी प्रकरणी पोलिसांनी आरोपी बजरंग मंगलचंद अग्रवाल या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने आरोपीस 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा कर्नाटक येथील आहे. पोलिस कोठडी दरम्यान आरोपीची कसून चौकशी केली जाणार असून विदर्भातील काही बिजमाफीयांचा शोध पोलिस घेत आहेत.
कृषी केंद्राची घेणार झाडाझडती
जिलह्यातील विविध कृषी केंद्राची झाडाझडती घेण्यात येणार असून यामाध्यमातून बनावट माल शोधला जाणार आहे. - गिरीश नानोटी, जिल्हा गुणनियंत्रक निरिक्षक.