ज्येष्ठ नागरिक दिन / ज्येष्ठ नागरिक दिन : वृद्धांना हवा मायेचा ओलावा अन् विरंगुळा

विलास देशमुख

Oct 01,2013 10:37:00 AM IST

अकोला - प्रगत अशा मुंबई, पुण्याच्या तुलनेत खान्देश, विदर्भ, वर्‍हाडात ज्येष्ठांना अधिक प्रेमळ वागणूक मिळते. आयुष्याच्या सायंकाळी ज्येष्ठांना केवळ मायेचा ओलावा अन् विरंगुळा हवा असतो. त्यांचेशी चार गोष्टी करणारा, त्यांना हसवणारा, आपुलकीने संवाद साधणारा कुणीतरी असावा, म्हणजे झाले, असे मत 93 वर्षांचे साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते नटवरलाल चौधरी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ते आपले मनोगत व्यक्त करत होते.

नटवरलाल चौधरी मूळचे तळोदे (जि. नंदुरबार)चे असून, 50 वर्षांचे असताना अकोल्यात स्थायिक झाले. त्यांनी विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मस, रोटरी क्लब, सन्मित्र सभा, टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, मुद्रक संघ, स्वदेशी जागरण मंच, जिल्हा बाल आनंद समिती, बेरार एज्युकेशन सोसायटी, गुजराती समाज, ज्येष्ठ नागरिक संघ, शं. बा. शिंपी स्मृती समिती, बाबासाहेब उटांगळे षष्ट्यब्दीपूर्ती समिती व अमृतमहोत्सव समिती, अकोला आदींचे अध्यक्षपद भूषवले. तसेच अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. आज चार शब्द बोलताना त्यांचे ओठ थरथरतात, तसेच त्यांना कमी ऐकू येते. मात्र, त्यावेळचा अकोला, त्यांनी राबवलेल्या चळवळी, उपक्रमाविषयी त्यांना भरभरून बोलावेसे वाटते. ते म्हणतात, पुणे, मुंबईसारख्या प्रगत महानगरांमध्ये जेवढी ज्येष्ठांची संख्या वृद्धार्शमात आहे त्या तुलनेत खान्देश, विदर्भाची स्थिती खूप चांगली आहे. तसेच या वयात वृद्धांना आपले विचार, भावना ऐकवण्यासाठी कुणी हवा असतो. मात्र, वाढत्या स्पर्धेमुळे आजच्या पिढीकडे एवढा वेळ नाही. तसेच ज्येष्ठांना आपला वेळ कसा घालवावा, याची चिंता असते. म्हणून शासनाने अशा ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना करावी. ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत दिली , ही अभिनंदनीय बाब आहे.

X
COMMENT