आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिक चौधरी यांनी दिला स्मशानालाही चकमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जन्माला येणा-या प्रत्येक व्यक्तीचा शेवट स्मशानातच होतो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, हा समज शहरातील दिगंबर दगडू चौधरी (८१) यांनी कृतीतून खोटा ठरवला असून, त्यांनी त्यांच्या निधनानंतर चक्क स्मशानाला चकमा दिला आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे देहदान घडवून आणले. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळालीच; पण मरणानंतरही त्यांचे अस्तित्व कायम आहे. त्यामुळे इतरांसमोर आदर्श निर्माण झाला आहे.

दिगंबर चौधरी हे मूळ जळगाव जिल्ह्यातील. त्यांना लहानपणापासून समाजकार्याची आवड. वयाच्या पंचविशीत ते अकाेला पोलिस दलात शिपाई म्हणून नोकरीला लागले. दरम्यान, सुमनबाई यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत त्यांनी सेवा दिली. वर्ष १९९३ मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून ते निवृत्त झाले. शहरातील न्यू तापडियानगरात त्यांचे घर. निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले. मात्र, जिवंत असेपर्यंतच आपण सामाजिक कार्य करू शकतो त्यानंतर नाही, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळेच मरणानंतरही आपण इतरांच्या कामी पडावे, या उदात्त हेतूने त्यांनी िडसेंबर २००६ ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मरणोत्तर देहदानाचे संकल्पपत्र भरून दिले. याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. शनिवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची पत्नी सुमनबाई, मुलगा अॅड. नरेंद्र आणि रवी, मुलगी वंदना बावस्कर, सुषमा चौधरी यांनी आपले दु:ख बाजूला सारून कुठलाही धार्मिक विधी करता देहदान घडवून आणले.

दिगंबर चौधरी यांनीही घडवून आणले देहदान
शहरातीलशिक्षण तज्ज्ञ डॉ. गजानन नारे आणि प्रा. नितीन ओक यांनीही आपल्या आप्तस्वकीयांचे यापूर्वी देहदान घडवून आणले. आता देहदान आणि अवयवदान ही लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रत्येकाने संकल्पपत्र भरून देणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

कसे करावे देहदान
मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना अनेक मृतदेहांची गरज लागते. आप्तस्वकीयांचे निधन झाल्यापासून दोन तासांच्या आत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला माहिती द्यावी. महाविद्यालयाचे अधिकारी घरी येऊन पुढील प्रक्रिया पार पाडतात. शिवाय, इच्छुकांनाही महाविद्यालयामध्ये देहदानाचे संकल्पपत्र भरून देता येते. पण, या पत्राची माहिती आपल्या नातलगांना देणे आवश्यक आहे.