आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांच्या दरबारी सतत उपेक्षाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे सुरक्षेबाबत ज्येष्ठ नागरिकांच्या पदरात पोलिस प्रशासनाकडूनही निराशाच पडली आहे.

अधिसूचनेनुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यांचा अहवाल दर महिन्याला पोलिस महासंचालक आणि जिल्हाधिकार्‍यांना सादर करणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयानेच असा कोणताही अहवाल पाठवण्यात येत नसल्याचे माहितीअंतर्गत लेखी कळवले आहे. एकाकी जीवन जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होणे, त्यांच्या घरात चोरी, दरोडे पडण्याच्या घटना घडतात. पोलिस या नागरिकांच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेतातच, असेही नाही. तसेच तक्रारीचा पाठपुरावा करणे ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक क्षमतेअभावी शक्य होत नाही. बाबींचा विचार करून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने अधिसूचना जारी केली.

पोलिसांच्या जबाबदारीत वाढ
नवीन अधिसूचनेत फेरबदल करण्यात आले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या नावांची अद्ययावत यादी तयार करावी लागणार आहे. एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्य असलेल्या स्वयंसेवकांची समिती स्थापन करावी लागणार असून, या समितीला महिन्यातून किमान एक वेळा तरी ज्येष्ठ नागरिकांची भेट घ्यावी लागते. ज्येष्ठ नागरिकांबाबत घडलेल्या गुन्ह्यांची नोंद स्वतंत्र वहीत करावी लागते. पोलिसांना ही नोंदवही जनतेला निरीक्षणासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल. यांतील गुन्ह्यांचा मासिक अहवाल दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित पोलिस ठाण्याला पोलिस अधीक्षकांना सादर करावा लागणार आहे. पोलिस अधीक्षकांना दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत तपासामधील प्रगती, न्यायिक तपशील असलेला अहवाल पोलिस महासंचालक आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले.

ज्येष्ठांकडे सहानुभूतीने पाहावे
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या संपूर्ण अधिसूचनेची अंमलबजावणी सर्वत्र होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपासही त्वरित व्हावा अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने या ज्येष्ठ नागरिकांकडे सहानुभूतीने पाहणे गरजेचे आहे.त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.’’ ना. ना. इंगळे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सदस्य