आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Social Worker DR. Prakash Amte News In Marathi

तिस-या पिढीतही सेवेची तीच कमिटमेंट असल्याचा आनंद- डॉ. प्रकाश आमटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बाबांचावसा रेटत दुर्गम भागातील आदिवासींची सेवा मी परिस्थितीवर मात करत केली, तोच वसा माझ्यानंतर आज तिसरी पिढी पेलण्यास पुढे आली आहे, याचा मला खरा आनंद वाटतो. माझ्या नि:स्वार्थ सेवेला आज, तरुणाईकडून प्रतिसाद मिळते, त्यांच्यातही समाजासाठी काही करण्याची जिद्द, इच्छा आहे, यापेक्षा दुसरे समाधान नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले.
महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेत आज, नोव्हेंबरला ‘अतिदुर्गम भागात आदिवासींना तातडीची रुग्ण सेवा देणे’ या विषयावर डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले अनुभव कथन केले. डाॅ. आमटे म्हणाले की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुर्गम आदिवासी भागात रुग्णसेवेला सुरुवात झाली. या आदिवासी भागात कुठल्याच सुविधा नसून कुठल्याही आजारानंतर उपचारासाठी प्रथम मांत्रिक, पुजाऱ्याकडे धाव घेतली जाते. अशात एक दहा वर्षांचा चिमुकला ४० टक्के आगीत भाजल्याने माझ्याकडे उपचारासाठी आला. त्यांच्या अंगात किडे पडले होते, त्यावर उपचार केल्यानंतर तो महिनाभरात बरा झाला. मी बरा केलेला तो पहिला रुग्ण होता, तेथून मग हळूहळू रुग्ण येऊ लागले. अर्धपोटी जगणारे आदिवासी नाल्याचे, नदीचे दूषित पाणी पित, डासांचा तर उद्रेक आहे. त्यामुळे अनेक प्रकाराचे आजार बळावतात. दुर्गम भागात मिळेल त्या अौषधी, वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची मी सेवा करण्याचा नि:स्वार्थ प्रयत्न केला. रुग्णांना बेशुद्ध करण्याची यंत्रणा नसताना १०० टाके घातले. झाडावरून पडून हाड मोडलेले रुग्ण येत, त्यांचे हाड नेमके कुठे मोडले हे निदान करणे कठीण होत होते. हळूहळू अडचणींवर मात करत रुग्णसेवा सुरूच ठेवली. अनेक शस्त्रक्रिया झाडाखाली, दिव्याच्या उजेडात केल्या. मी कधी रुग्णांच्या नातेवाइकांकडून ‘कन्सर्न’ घेतले नाही, गरजही भासली नाही. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असायचा, अन् तोच महत्त्वाचा आहे. मग, प्रसूतीला, दंत रुग्णांच्या सेवेलाही सुरुवात झाली. दूषित पाण्यामुळे बहुतांश आजार होत असल्याने मी एक बोअर करून घेतली. मात्र, ती वारंवार नादुरुस्त होत असल्याने आमच्यापैकी तिघांनीच दुरुस्तीचे काम शिकून घेतले. मग, सरकारी यंत्रणेला बोअर करण्याची मागणी केली, त्यांनी आमच्याकडे दुरुस्ती यंत्रणा नसल्याचे सांगितले. आम्ही त्यांना तुम्ही बोअर करा, देखभाल-दुरुस्ती आम्ही करू म्हटल्यानंतर बोअर झाल्या. माझ्याकडे वीज मंडळाचे बडे अधिकारी वाघ, बिबट अशी जंगली श्वापद पिंजऱ्याविना कशी राहतात हे पाहण्यासाठी अाले होते. ते पाहून झाल्यानंतर त्यांचेसमोर विजेचा प्रश्न मांडला अन् १९९५ मध्ये आमच्याच जागेत पहिले सबस्टेशन उभे ठाकले. वीज आल्याने रुग्णांसाठी अनेक सुविधा, अत्याधुनिक यंत्रणा उभी करता आली. माझी पत्नी मंदाकिनीसोबत माझी सूनही आता रुग्णसेवा करते. त्यामुळे तिसऱ्या पिढीत समाजसेवेचे बाळकडू पोहोचल्याचा आनंद आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा विचार करणे एक चमत्कार असून, त्याहीपेक्षा कुठलाच धांगडधिंगा, व्हिलन, गाणी, नृत्य नसलेला हा चित्रपट यशस्वी होणे त्याहीपेक्षा मोठा चमत्कार आहे. माझ्यावरील चित्रपटानंतर अनेक तरुण संपर्क साधून त्यांनाही समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा असल्याचे सांगतात, हे मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.