आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हर डाऊनमुळे डोकेदुखी वाढली; बारावीच्या परीक्षेचे अर्ज रखडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्व्हर डाऊन असल्यामुळे मार्च 2014 मध्ये होणार्‍या बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरताना महाविद्यालयांची डोकेदुखी वाढली आहे. 6 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, 20 टक्केही अर्ज सबमिट झाले नाहीत. त्यामुळे अर्ज दाखल होणार की नाहीत, या प्रश्नामुळे महाविद्यालयांसह विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. याच कारणावरून शहरातील एलआरटी महाविद्यालयात मंगळवारी विद्यार्थ्यांनी गदारोळ करून रोष व्यक्त केला.
मार्च महिन्यात होणार्‍या बारावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास 27 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती साध्या कागदावर भरून देण्यास सांगितले. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 6 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस राहिले आहेत. अर्जासह विलंब शुल्क भरण्याची तारीख 7 ते 12 डिसेंबर राहणार असून, परीक्षा शुल्क 355 रुपये आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याने महाविद्यालय प्रशासनावरील ताण वाढला आहे. अर्ज वेळेत भरले जाणार की नाहीत, अशी चिंता विद्यार्थ्यांनाही भेडसावत आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत येत असलेल्या अडचणीमुळे एलआरटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मंगळवारी गदारोळ केला. आजपर्यंत या महाविद्यालयात 900 अर्जांपैकी केवळ 90 अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. एकीकडे वेबसाइट बंद, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचा गोंधळ यामुळे महाविद्यालयातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 6 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता ही वेबसाइट बंद होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रश्न पडला आहे.
केवळ 90 अर्ज दाखल
वेबसाइट कधी बंद, कधी सुरू असल्यामुळे अर्ज कसे भरावेत, असा प्रश्न आहे. आतापर्यंत 90 अर्ज सबमिट झाले.मुदत वाढवल्यास सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येतील. प्रमोद जोशी, वरिष्ठ लिपिक, एलआरटी कॉलेज, अकोला