आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेतू कंत्राट रद्द करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातील सोळा पंचायत समिती स्तरावर चालवल्या जाणार्‍या सेतू केंद्रांचे नवीन कंत्राट गुजरातमधील ‘इन्फोटेक’ कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, या कंपनीने केंद्रात कार्यरत कर्मचार्‍यांना अत्यल्प वेतनावर काम करण्याची अट घातली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, हा कंत्राट रद्द करावा,अशी मागणी सेतू केंद्र संचालक व कर्मचारी वर्गातून होत आहे.
जिल्ह्यातील सेतू केंद्र संचालनाकरिता राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून गुजरातमधील ‘इन्फोटेक’ कंपनीला कंत्राट मिळाला आहे. 15 ऑगस्टपर्यंत सुसज्ज इमारतीमध्ये सेतू केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या केंद्रांमध्ये काम करणार्‍यांना अत्यल्प मानधनात काम करण्याची अट घालण्यात आली आहे. यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून, हा कंत्राट रद्द करण्याची मागणी सध्याच्या सेतू केंद्र संचालकांनी केली आहे.

सध्या जिल्ह्यातील सोळाही तहसीलवर खासगी कंत्राटदारांकडून सेतू चालवण्यात येत आहेत. मात्र, विद्यमान कर्मचार्‍यांना अत्यल्प वेतन अदा करण्याची अट कंपनीने घातली आहे. कर्मचार्‍यांना तोकड्या वेतनात काम करावे लागणार, असे पत्र कंपनीच्या वतीने देण्यात आल्याचे सेतू सुविधा केंद्र कर्मचारी संघटनने म्हटले आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेतूचालकांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदारांशी चर्चा केली. मात्र, कंपनीच्या ध्येय-धोरणानुसार काम करावे लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शाळांचा हंगाम असल्यामुळे शैक्षणिक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी सेतू सुविधा केंद्र कर्मचारी संघटनेने केली आहे.

दरम्यान, या कंत्राटविरोधात शहरातील अर्जनविसांनी सोमवारी धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. नवीन कंत्राट सेतू केंद्र संचालक,कर्मचारी व अर्जनविसांकरिता अडचणीचा असल्याने तो तत्काळ रद्द करावी,अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील अर्जनविस मोठय़ा संख्येने उपस्थित होते.