आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेव्हन स्टार कारखान्यावर रोखली गेली संशयाची सुई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अवैध स्पिरिट जप्ती प्रकरणात राजू जयस्वाल यांच्या ‘सेव्हन स्टार’ या देशी दारूची निर्मिती करणार्‍या कारखान्यावरही संशयाची सुई रोखली गेली आहे. याप्रकरणी रविवारी मध्य प्रदेशात केलेल्या चौकशीतून राज्य उत्पादन विभागाला महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच जयस्वाल यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

राज्य उत्पादन विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने मूर्तिजापूर येथे 14 हजार लिटर स्पिरिट असलेला सीजे-04-8970 या क्रमांकाचा टँकर पकडला होता. टँकरसोबतच्या गजानन पुंडलिक मेहसरे, अविनाश रामभाऊ पाटील आणि टँकरचालक इम्रान युसूफ बेग यांना भरारी पथकाने अटक केली होती. या स्पिरिटची किंमत 50 लाख रुपये आहे.

पेट्रोलपंपावर लक्ष केंद्रित
पथकाने टँकर मूर्तिजापूर परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ पकडला होता. हा पंप अकोल्यातील एक मद्य व्यावसायिकाचा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अटक झालेल्यांपैकी दोघे मद्य व्यावसायिकाच्या एका कर्मचार्‍याचे मित्र आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे पंपाच्या मार्गाने मद्य व्यावसायिकापर्यंत पोहोचतात, या दिशेने तपास सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
या प्रकरणात लाला नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. पथक लालाचा शोध घेत आहे. त्याच्यासह आणखी दोघांनी मदत केल्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

‘टीपी’च्या नोंदीवरून चौकशी
स्पिरिटसाठी शासन ट्रान्सपोर्ट पास (टीपी) देते. त्यावर स्पिरिट वाहतुकीची नोंद असते. पथक पासची पाहणी करून चौकशी करत असल्याचे समजते.

गोवण्याचा प्रयत्न
स्पिरिट जप्ती प्रकरणात मला नाहक गोवण्यात येत आहे. फॅक्टरीत राज्य उत्पादन विभागाचे कर्मचारी-अधिकारी नियमित तपासणी करतात. त्यांना अद्याप काहीच आक्षेपार्ह आढळलेले नाही.’’ राजू जयस्वाल.

छत्तीसगडमध्ये धागेदोरे!
अवैध स्पिरिटचा टॅँकर इंदूरहून अकोल्याकडे निघाला होता. राज्य उत्पादन पथकाच्या मुंबई येथील पथकाने हा टॅंकर एका पेट्रोल पंपा समोर पडकला होता. या टॅँकरची नोंदणी छत्तीसगडमधील आहे. त्यामुळे तपास पथक टॅँकरबाबतही चौकशी करणार आहे.