आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shegaon Sant Sahitya Sammelan Latest News In Marathi

पंढरीचा निर्णय वारकरी, फडकर्‍यांना विचारूनच, शेगावमध्ये तिसर्‍या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - ‘पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची नवी व्यवस्थापन समिती वारकरी आणि फडकर्‍यांना विचारात घेऊनच स्थापन केली जाईल’, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. कै. गजानन पाटील बाजार समितीच्या मैदानावर शनिवारी सकाळी तिसर्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
संमेलनाध्यक्ष माणिक आबाजी गुट्टे, स्वागताध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक, आमदार चैनसुख संचेती, दिलीप सानंदा, राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, गुरुबाबा औसेकर, शेगावचे नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दराडे, पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर, तुकाराम महाराज काळे, बद्रीनाथ तनपुरे व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे म्हणाले, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि विज्ञानवाद यांची शिकवण वारकरी संतांनी जगाला दिली. संतांनी केवळ माणुसकी शोधण्याचाच प्रयत्न केला नाही तर माणुसकी निर्माण केली. त्यामुळे भविष्यातही संतसाहित्याची उपयुक्तता राहणार आहे.
संमेलनाध्यक्ष माणिक गुट्टे म्हणाले, शेतकरी आणि वारकरी वेगळे नाहीत. ते अद्वैत आहेत. त्यामुळे शेतीव्यवसायाला बळकटी द्यायला हवी. आज सर्वच प्रवाहातील साहित्यिकांवर ज्ञानेश्वर-तुकारामांचा प्रभाव आहे. यात मर्ढेकरांपासून ते ढसाळांपर्यंत सर्वच साहित्यिक येतात. तुकोबारायांचे विचार हे स्वतंत्र दर्शन आहे. या दर्शनाच्या मांडणीची सुरुवात ज्ञानेश्वरांनी केली. तुकोबांच्या मांडणीतून हे दर्शन पूर्णत्वास गेले. सामाजिक न्याय मंत्री मोघे, वारकरी परिषदेचे सचिव डॉ. मोरे, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. टिळक आणि गुरूबाबा औसेकर यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश मिरगे यांनी केले. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविक केले. चेतन महाराज (कबीर बुवा) यांनी आभार मानले.
छायाचित्र - संत साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष माणिक आबाजी गुट्टे, स्वागताध्यक्ष शिवाजीराव मोघे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, गुरुबाबा महाराज औसेकर व अन्य. (इन्सेट) संमेलनात बोलताना गृहमंत्री शिंदे.