आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारात साधते मतदारांशी संवाद- शिल्पा हिंगणकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना आपल्या पक्षाची, उमेदवाराची सकारात्मक बाजू मांडण्यासाठी सर्वत्र प्रचारकार्याला उधाण आले आहे. बैठका, सभा, कॉर्नर मीटिंग याप्रमाणेच घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात आहे. राजकारणात प्रवेश केलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार अजय हिंगणकर यांच्या पत्नी शिल्पा हिंगणकर यासुद्धा प्रचारकार्यात हिरिरीने भाग घेत आहे. घरची कामं, मुलांचा अभ्यास, साहेबांच्या वेळा सांभाळणे आणि मिळालेल्या वेळेत प्रचार करताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे. एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे मुलांच्या परीक्षा, दोन्ही महत्त्वाचे असल्याने कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. सकाळीच साहेब दौर्‍यावर निघत असल्याने सकाळी 6 वाजताच सर्व तयार ठेवावे लागते. घरचे काम करून दुपारच्या वेळेत त्या प्रचारकार्य करतात. दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अकोटजवळील शेजारच्या गावांमध्ये जाऊन प्रत्येक मतदारांशी त्या संवाद साधतात. सायंकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत अकोटमधील विविध भागांत जाऊन मतदारांची भेट घेणे असा दिनक्रम त्यांचा सुरू आहे. घरचे काम, मुलांचा अभ्यास, कार्यकर्त्यांच्या सोयींकडे लक्ष आणि मतदारांच्या भेटी हे सर्व करत असताना त्या दूरध्वनीवरूनदेखील मतदारांच्या संपर्कात आहेत. दिवसभर घरचे काम करताना नातेवाइकांना दूरध्वनी करून मतदानाबद्दल जागृती करतात. शिल्पा यांचे माहेर मूर्तिजापूर असल्याने कोणतेही नातेवाईक सुटू नये, याची त्या कटाक्षाने काळजी घेत आहे. आम आदमी पार्टीबद्दल लोकांना माहिती असली तरी साहेबांनी राजकारणात प्रवेश का केला, निवडणुकीच्या रिंगणात असले तरी समाजकार्य करत आहे, संधी दिल्याशिवाय कार्य कसे समजणार, अशा विविध पद्धतीने माहिती देऊन त्या महिला मतदारांना जोडत आहेत. बैठका, कॉर्नर मीटिंग न घेता घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर अधिक भर देत आहे. प्रचारकार्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच त्या राहत असलेल्या अपार्टमेंटमधील महिला, शिल्पा यांच्या मैत्रिणी त्यांना मदत करत आहे. सायंकाळी चर्चा करून रोजच्या कार्याची रूपरेषा ठरवली जाते. साहेब रात्री घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, यासाठी त्या प्रयत्न करत आहे. प्रचारासाठी सर्वांना दूरध्वनी करून माहिती देण्यावर अधिक भर दिला. आता शेवटचे दोन दिवस राहिल्याने सर्वांना त्या रिमाइंडिंग कॉल करत आहेत.
शब्दांकन : हिरल गावंडे