आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Gulabrao Gawande, Divya Marathi

चांगल्या रस्त्यावर डांबरीकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेकडून रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यकता नसताना चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. यामुळे शासनाच्या निधीचा अपहार होत आहे’, असा आरोप करत शिवसेना नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी रविवारी 16 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावरील महाबीज कार्यालयासमोर दुपारी 1.30 ते 4.30 वाजेपर्यंत तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन रस्त्यांचे डांबरीकरण थांबवून याचे कोणत्याही प्रकारचे देयक काढण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले.


अकोला (अशोक वाटिका) ते शिवरदरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यादरम्यान कुठेही खड्डे वा रस्ता खराब झालेला दिसून येत नाही. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कंत्राटदार मिलीभगत करून चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण करत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार लक्षात येतात शिवसेना नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता कुठेही खराब झालेला नसताना त्यावर डांबरीकरण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील महाबीज कार्यालयासमोर आज, 16 मार्च रोजी दुपारी 1.30 ते 4.30 वाजेपर्यंत रास्ता रोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. या आंदोलनात शिवसेनेचे सूरज गिरी महाराज, माजी सरपंच मधुकर गांजरे, जगन गावंडे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, गुलाबराव गावंडे यांच्या आंदोलनाला माजी आमदार तुकाराम बिरकड यांनी भेट घेऊन माहिती घेतली. या लढय़ात आम्हीही सहभागी असल्याचे त्यांनी सांगिंतले.


अभियंत्यांची धाव: रस्ता डांबरीकरणासाठी शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच उपअभियंता सतीश अंभोरे, सेक्शन इंजिनिअर खान यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्ते गुलाबराव गावंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हे काम त्वरित थांबवण्यात येईल, याचे कोणतेही देयक काढण्यात येणार नाही, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.


पोलिसांकडे तक्रार : चांगल्या रस्त्यावर गरज नसताना डांबरीकरण केले जात आहे. आज रविवार असताना कामाची घाई केली जात आहे, काम सुरू असताना कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी हजर नाही, एकीकडे खराब रस्ता दुरुस्त करणे सोडून चांगल्या रस्त्यावर विनाकारण काम केले जात असून, यात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार होत आहे.
याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.