आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivrajsingh Chauhan In Maharashtra For Assembly Election Rally

शिवराजांनी गायले मध्य प्रदेशचे गोडवे,पंधरा वर्षांत महाराष्ट्राची अधोगती झाल्याची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे अग्रस्थान होते. पूर्वी अर्थव्यवस्थेचे इंजिन बनायचे असेल तर राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली असल्याचे सांगून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तेथील विकासाचे गोडवे गायले.

रविवारी दुपारी खुल्या नाट्यगृहात भाजप अकोला पश्चिमचे उमेदवार गोवर्धन शर्मा आणि पूर्वचे रणधीर सावरकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे होते.

चौहान म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात टूजी, थ्रीजी, आदर्श, सिंचन, जिजाजी घोटाळा झाला. जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे. युतीच्या काळात महाराष्ट्रात भारनियमन नव्हते, परंतु आता लोकांना, शेतक-यांना वीज मिळत नाही. मध्य प्रदेशात चोवीस तास वीज मिळते, शेतक-यांना बिनव्याजी कर्ज देत आहोत, सिंचन क्षेत्र सात लाख हेक्टरवरून साडेसत्तावीस लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. महिला सुरक्षित आहेत, असेच वातावरण महाराष्ट्रात येण्यासाठी आपण राज्याचा जावई म्हणून योगदान देण्यास तयार आहोत.

भाजपच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात औद्योगिक, आर्थिक प्रगती सुरू झाली आहे. भाजपच्या राज्यांतही विकास होत आहे, तसाच विकास महाराष्ट्रात व्हावा यासाठी येथे पक्षाचे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

धनगर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सैतानसिंग पाल भोपाळ यांचे सुरुवातीला ओजस्वी भाषण झाले. तसेच, आ. गोपीचंद नेमा इंदूर, ब-हानपूरच्या महापौर माधुरी पटेल, अ‍ॅड. मोतीसिंग मोहता यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर अकोल्याच्या महापौर उज्ज्वलाताई देशमख, माजी महापौर अश्विनीताई हातवळणे, सुमनताई गावंडे, उमेदवार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, डॉ. अशोक ओळंबे, विजय अग्रवाल, किशोर पाटील, दीपक मायी आदी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले.

मामा हूं मैं!
शिवराजसिंह चौहान यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. राजराजेश्वर नगरीत आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त करतो, असे म्हटल्यावर मामा हूं मै, असे वाक्य त्यांनी उच्चारले आणि सभेत हशा पिकला. गोंदिया सासुरवाडी असल्याने त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राप्रति आपलीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

शिवराजसिंहांना न घेताच विमान उडाले
निवडणुकीच्या घाईगर्दीत कसे किस्से घडतील सांगता येत नाही. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना न घेताच विमान औरंगाबादहून अकोल्याला आले आणि पुन्हा औरंगाबादला गेल्यामुळे त्यांना सभेला येण्यास विलंब झाला, असे इंदूरचे आमदार गोपीचंद नेमा यांनी सांगितले. याबाबत तर्कवितर्कही बरेच झाले.