आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, शिवसंग्राम संघटनेचा धिंग्रा चौकात रास्ता रोको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील तळेगाव बाजार (ता. तेल्हारा) येथील शेतकरी विनोद रामदास खारोडे याने महावितरणच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे महावितरणच्या हिवरखेड शाखेचे सहायक अभियंता संदीप घोडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेने रविवारी धिंग्रा चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.
विनोद खारोडे याने तीन एकर शेतीमध्ये कर्ज काढून कूपनलिका खोदली. त्यानंतर वीजजोडणीसाठी मे २०१३ ला महावितरणच्या हिवरखेड कार्यालयात अर्ज सादर केला. यासाठी त्यांनी सहा हजार दोनशे रुपये शुल्कही भरले. मात्र, वीजजोडणी मिळाली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारी २०१४ रोजी स्मरणपत्रही दिले, तरीही वीजजोडणी मिळाली नाही. दरम्यान, गैरअर्थसाहाय्याची मागणी होत होती. कार्यालयाचे उंबरठे झिजवून वारंवार पाठपुरावा करूनही वीजजोडणी मिळत नसल्याचे बघून विनोदने १८ मे रोजी हिवरखेड महावितरणच्या कार्यालयात सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. यात त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकाराला कोण जबाबदार आहे, हेसुद्धा चिठ्ठीत लिहून ठेवले. दरम्यान, महावितरणने अभियंता घोडे यांना निलंबित केले, तर तेल्हारा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र राऊत यांची तत्काळ बदली केली. मात्र, अभियंता घोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी चव्हाण यांनी आंदोलकांची भेट घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात नानासाहेब भिसे, शिवा मोहोड, राम बिल्हेवार, केशव गवई, सुरेश गावंडे, गोलू केवट, प्रवीण चतरकर, मनोहर ढगेवार, इलियास खान, रमेश पवार, मंगेश सावरकर, सुनील अंजनकर, चंदन गिरी, प्रतीक वानरे, सागर मोहोड, संगम माेहोड, गोपाल देशमुख, प्रथमेश देशमुख, संजय यावतकर, विशाल खारोडे, मयूर शिंदे, चंद्रकांत मोरे, संतोष इंगळे, अतुल अहेरकर, रवी सातव, आदी सहभागी झाले होते.
असे झाले आंदोलन
- सुरुवात: सकाळी १०.१० वाजता
- महावितरण, पोलिस यांच्याविरोधात घोषणाबाजी : १०.११ ते १०.२० वाजता
- एसडीपीओंची भेट : १०.२२ वाजता
- आश्वासनानंतर आंदोलनाची समाप्ती : १०.३५
सर्वांनाच कृषिपंपांची जोडणी द्या
बहुतांशशेतकऱ्यांना चार ते पाच वर्षांपासून कृषिपंपांसाठी वीजजोडणी मिळाली नाही. त्यामुळे सिंचनासाठी त्यांना अडथळे येत असून, उत्पन्नात घट होत आहे. परिणामी, महावितरणने सर्वच शेतकऱ्यांची तत्काळ वीजजोडणी करून द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
२५ मिनिटे वाहतूक विस्कळीत
याआंदोलनामुळे धिंग्रा चौक ते रेल्वे स्टेशन रोड, प्रमिलाताई ओक हॉल आणि टॉवर चौक ते जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थानापर्यंतची वाहतूक २५ मिनिटे विस्कळीत झाली होती. परिणामी, अनेकांना त्रास सहन करावा लागला. वाहनांची कोंडीही झाली.
...तर मुंडन आंदोलन
- अभियंता घोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पाळले गेले नाही, तर शिवसंग्रामचे सर्व कार्यकर्ते हिवरखेड पोलिस ठाण्यापुढे सामूहिक मुंडन आंदोलन करणार आहेत.''
शिवा मोहोड, विदर्भ अध्यक्ष शिवसंग्राम संघटना
बातम्या आणखी आहेत...