आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे धरणे अन् भाजपचा मोर्चा; पुरवठा अधिकार्‍यांना फुटला घाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला महानगरातील पुरवठा यंत्रणा बिघडली असून, याकडे जिल्हाधिकारी यांचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप करत, भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 डिसेंबरला दुपारी मोर्चा धडकला. कार्यकर्त्यांचा त्वेष पाहून जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांना घाम फुटला होता.
भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे व अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष चाँद खान यांचे नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या या मोर्चास शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील बीपीएल कार्डधारकांना ओल्या दुष्काळाची झळ कमी बसावी म्हणून जुलै 2012 ते फेब्रुवारी 2013 दरम्यान कार्डवर दरमहा चार किलो गहू व एक किलो तांदूळ देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी कार्डधारकांना धान्यच दिले नाही. मंजुरीनंतरही केसरी कार्डावर दर महिन्याला 10 किलो गहू व पाच किलो तांदळाचे वाटप झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही बीपीएल कार्डधारकाला 20 किलो गहू व 15 किलो तांदूळ दिले नाही. बर्‍याच ठिकाणी रेशन दुकानदारांना रॉकेल व साखर मिळाली नाही, याच्या चौकशीची मागणी भाजपने केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने हजारो क्विंटल गहू व तांदळाचा अपहार झाला आहे. जिल्हाधिकारी अरुण शिंदे हे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष चाँद खान, शेख पिरू शेख मलंग गवळी, रमजान उर्फ बाबा गोरवे, कदीर खान कुदरत खान आदींनी सहभाग घेतला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या.
सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी शुक्रवारी भाजप आणि शिवसेना रस्त्यावर उतरली. हॉटमिक्सद्वारे तयार होणार्‍या रस्त्यांचे काम त्वरित बंद करण्यासह ग्रामीण भागातील वीज भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना व युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शुक्रवारी धरणे देण्यात आले. दुसरीकडे जिल्हाभर अन्नधान्य, साखर, रॉकेलचा पुरवठा थांबल्याचा आरोप करत भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ज्येष्ठ नेते गुलाबराव गावंडे, वीज भारनियमन रद्द करा
प्रतिनिधी । अकोला
जिल्ह्यांतर्गत सुरू असलेल्या हॉटमिक्स पद्धतीच्या रस्त्यांचे काम तातडीने बंद करण्याचा इशारा शिवसेनेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. तसेच ग्रामीण भागातील वाढलेले भारनियमन रद्द करण्यासाठी शिवसेनेतर्फे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या नेतृत्वात 13 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देण्यात आले.
जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांच्या कामासाठी हॉटमिक्स (उष्मानिर्मित डांबर) चा वापर करण्यात येत आहे. या पद्धतीत लाखो रुपये खर्च करूनही काही महिन्यातच रस्ता उखडतो. नागरिकांनी हॉटमिक्सऐवजी कोल्डमिक्स (थंडमिर्शित डांबर) रस्त्यांची मागणी संबंधित अधिकारी व ठेकेदाराकडे करावी, असे आवाहनही शिवसेनेने केले. जिल्ह्यात आमदार, खासदार व सार्वजनिक बांधकामाच्या निधीतून विकासकामे होत आहेत. याअंतर्गत तयार होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे झालेल्या अपघातात अनेकांचे मृत्यू होत आहेत. जिल्ह्यातील पहिले जुने रस्ते दुरुस्त करावे, त्यानंतरच नवीन रस्त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही शिवसेनेने केली. मलिदा लाटण्यासाठी चांगल्या रस्त्यांवर नाहकच होणारे काम बंद करावे, असा इशाराही देण्यात आला. शेतकर्‍यांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे रब्बीच्या पिकांनाही फटका बसत असल्याने ग्रामीण भागातील भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात युवासेनाप्रमुख संग्राम गावंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ भालतिलक, बादलसिंह ठाकूर, नगरसेवक विनोद मापारी, नगरसेवक पंकज गावंडे, विठ्ठलराव गावंडे, अप्पूदादा तिडके, नगरसेवक देवर्शी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, अक्षय भालतिलक आदी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.