आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुगाराच्या रकमेवरून राडा; एक ठार, दोन जण गंभीर, आरोपींना 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुगारात हरलेली रक्कम परत मिळवण्याच्या वादातून आठ ते दहा जणांनी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास सशस्त्र हल्ला चढवला. गवळीपुर्‍यातील गणपती मंदिरामागे घडलेल्या या थरारक घटनेमधील गंभीर तिघा जखमींपैकी एकाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी चौघांना अटक केली असून, बुधवारी न्यायालयाने आरोपींना 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शेख अकरम शेख बुरहान असे मृतकाचे नाव आहे, तर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविकेचे पती मेहबूब खान व शेख सलीम असे जखमींचे नाव आहे. गवळीपुर्‍यातील मंदिरामागे वरली अड्डा चालतो. तेथे मंगळवारी वरलीमध्ये हरलेले पैसे परत मिळवण्याच्या वादातून युवकाने वरलीचालकासोबत वाद घालून त्याला मारहाण केली. वरलीचालकाने फोनवरून घटनेची माहिती मित्रांना दिली. त्यानंतर अन्य नऊ जणांनी घटनास्थळी पोहोचून तलवार व लोखंडी पाइपने वाद घालणार्‍या युवकावर हल्ला केला. या प्रकरणात प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविकेचे पती मेहबूब खान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु एका युवकाने खान यांच्यावरही तलवारीने हल्ला केला. यात मेहबूब खान, शेख अकरम शेख बुरहान, शेख सलीम हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळताच एपीआय शिरीष खंडारे हे घटनास्थळी पोहोचले. जखमींना ताबडतोब सर्वाेपचार रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून खासगी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र तसेच दुचाकी (एम.एच. 30 एके 984) जप्त केली. शेख सलीम शेख बुरहान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख साजीद शे. सुलतान, शेख सुलतान शेख यासीन, शेख रसीद शेख सुलतानचा जावई, शेख रसीद शेख सुलतानचा मुलगा नईम यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 25 जून रोजी सायंकाळी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आंतरराज्य गुन्हेगाराकडून पिस्तूल केली जप्त
प्रतिनिधी । अकोला -
अनेक राज्यांतील गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला आरोपी वसिमखान एहसानखान (32) याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नायगाव परिसरात मंगळवारी रात्री पकडले. त्याच्याकडून 7 एमएमचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यातील पोलिस वसिमखानच्या मागावर होते. तो मूळचा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सुस्नेट, इतवारीबाजार येथील रहिवासी आहे. तेथील पोलिसांना गुंगारा देऊन तो अकोल्याला राहत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचला. 24 जूनच्या रात्री अकोला पोलिसांनी त्याला पोलिस प्रशिक्षण विद्यालयाजवळच्या समर्थ गॅस कंपनीच्या गोदामाजवळ पकडले. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख प्रमोद काळे, पोलिस उपनिरीक्षक फड, वाघळकर, शेख हसन, अन्वर यांनी ही कारवाई केली. वसिमखान अकोल्यात पकडला गेल्याने याविषयी पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना माहिती दिली आहे. वसिमखान याला 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(फोटो - आरोपींकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल.)