आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shri Bhavasagara Mauli Charitable Trust,Latest News In Divya Marathi

भवसागर माउली चॅरिटेबल ट्रस्टची पालखी मार्गस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- श्री भवसागर माउली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अकोला ते र्शीक्षेत्र पंढरपूर पायदळ पालखी सोहळ्यास 12 जूनला प्रारंभ झाला. रामदासपेठेतील नाना उजवणे यांच्या निवासस्थानावरून दुपारी 3 वाजता पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. या वेळी परिसरातील भाविक पालखीला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी, पूजाअर्चा करून पालखी पुढील प्रवासासाठी निघाली.
शेलार मामा महाराज यांच्या प्रेरणेने नाना उजवणे यांच्या मार्गदर्शनात 25 वर्षांपासून हा पालखी सोहळा आयोजित होत असून, यंदा 26 वे वर्ष आहे. र्शी भवसागर माउली चॅरिटेबल ट्रस्ट अकोलाद्वारा अकोला ते पंढरपूर पायदळ पालखीत विनामूल्य पायदळ वारकर्‍यांकडून कुठलीही वर्गणी न घेता नाना महाराज उजवणे व उजवणे परिवार दरवर्षी 300 ते 400 वारकरी घेऊन जातात. पायदळ पालखीसोबत दिंडीचालक दत्ता महाराज घोंगडे, दत्ता महाराज मालोकार, मनोहर महाराज डुकरे, राठोड महाराज, मोतीराम महाराज वाकोडे, रामकृष्ण महाराज अंबुसकर, शेषराव महाराज इंगळे, दिनकर महाराज कराळे, आनंदराव वक्टे महाराज यांच्यासह गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्यासह चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम या जिल्हय़ांतील वारकरी सहभागी झाले आहेत.
आज सकाळी नाना उजवणे यांच्या निवासस्थानी ठिकठिकाणीचे वारकरी पोहोचले. त्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर रस, पुरणपोळीचा पाहुणचार झाला. नंतर पालखीच्या तयारीची लगबग सुरू झाली. फुलांनी सजवलेल्या रथात ज्ञानेश्वर माउली व संत गजानन महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली. त्यांची विधिवत पूजाअर्चा करून आरती करण्यात आली. त्यानंतर ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ असा गजर करीत पालखीच्या प्रवासाला प्रारंभ करण्यात आला. सर्वात समोर बँडपथक त्यानंतर शिस्तबद्ध वारकरी टाळमृदंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले. पूजेत उजवणे कुटुंबीयांसह परिसरातील मान्यवरांनी सहभाग घेतला. पालखीसाठी कौलखेड, शिवनगर, उमरीतील वारकर्‍यांसह गजानन महाराज मंदिर समिती जुने शहर यांचे सहकार्य लाभले. नाना उजवणे यांच्या निवासस्थानावरून निघून पालखी मुकुंद मंदिर, आठल्ये प्लॉट, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाइन, मुख्य डाकघर, नवीन बसस्थानक, शहर कोतवाली, काळा मारोती, विठ्ठल मंदिरमार्गे गजानन महाराज मंदिर, शिवनगर येथे आज रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचली. 13 जूनला सकाळी 6 ला तेथून निघून शिवाजी नगरमार्गे पंढरपूरसाठी मार्गस्थ होईल.