आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shri Gajanan Maharaj, Latest News In Divya Marathi

‘गण गण गणात बोते’च्या गजराने दुमदुमली संतनगरी, 50 हजार वारकरी दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव- संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जमलेल्या लाखो भाविकांनी शनिवारी केलेल्या ‘गण गण गणात बोते’च्या गजराने शेगावनगरी दुमदुमून गेली होती. उत्सवानिमित्त जगन्नाथबूवा म्हस्के यांचे कीर्तन झाले. सकाळी 11 वाजता आरती व महाप्रसाद वितरण झाले. दुपारी 2 वाजता श्रींची पालखी नगर परिक्रमेसाठी निघाली. नंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजन झाल्यावर श्रींची पालखी, रथ, मेणा, गज, अश्व, भजनी दिंडी, पताकाधारी वारकरी पालखीसोबत होते. सायंकाळी पालखी मंदिरात पोहोचली. मंदिरात पोहोचल्यावर भजनी भारुडाने पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
श्रींच्या पालखीचे शहरवासीयांनी ठिकठिकाणी स्वागत केले. सुवासीनींनी पंचारतीने श्रींना ओवाळले. गुरांच्या दवाखान्याजवळ किशोर टांक यांच्या आरामशिनवर चहापाण्याची व्यवस्था केली होती. अनेक ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक आपल्या डोळयात साठवून घेत होते.संस्थानच्यावतीने वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. परगावाहून आलेल्या दिंड्यांचा सत्कार करून त्यांना भजनी व संत साहित्य वितरित केले. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रविवारी काल्याचे कीर्तन व गोपाल काला होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
संस्थानचे उत्कृष्ट व्यवस्थापन
देशभरातील देवस्थानांनी आदर्श ठेवावा अशी शेगाव संस्थानचे व्यवस्थापन असते. एवढ्या मोठ्या संख्येत भाविक आल्यावरही कुठेही गडबड झाली नाही. अतिशय नियोजनबध्द सर्व सुरळीत सुरू होते. दर्शनासाठी एकतर्फी मार्ग करण्यात आला होता. त्यामुळे दर्शन घेणे अधिक सुलभ झाले होते. असे व्यवस्थापन इतर कुठेच बघायला मिळत नाही, अशी प्रतिक्रिया वाशिमचे भाविक राजेश जहागिरदार यांनी दिली.
सुंदरगडावर शोभायात्रा
श्रीक्षेत्र नाणीज (जि. रत्नागिरी) येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे गजानन महाराज यांचा प्रगट दिन व जगद्गुरू रामानंदाचार्य यांचा जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शोभायात्रा, संगणक वाटप व नरेंद्र महाराज यांचे प्रवचन झाले. शोभायात्रेच्या मार्गावर लोकसंस्कृती व अध्यात्मच जणू अवतरले होते. त्यांच्या जोडीला पारंपारिक वाद्ये, प्रथा, परंपरांचा सुरेख मिलाफ येथे भाविकांना पाहण्यास मिळाला. भक्तांची अलोट गर्दी हे या वारीचे वेगळेपण ठरले.