आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मंदिरांसह घरोघरी जन्मले भगवान श्रीकृष्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गोकुळाष्टमी हा खराखुरा लोकोत्सव आहे. ‘गोविंदा आला रे..आला’च्या तालावर नाचत-गात कितीही उंचावरील दहीहंडी फोडणार्‍या तरुणाईला बघणं, हा वेगळाच सोहळा. आनंद, धाडस, संघटन, अध्यात्म यांचा मिलाफ गोकुळाष्टमीतून दिसून येतो. गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील विविध श्रीकृष्ण मंदिरांसह घरोघरी आज 17 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सवाची तयारी दिसून आली, तर उद्या दहीहांडी, गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीकृष्ण म्हणजे जीवन जगून, भोगून त्यातून निवृत्त होण्याचा महामंत्र. श्रीकृष्णाचे जीवन खरोखर लोकोत्तर. मात्र तमाम भारतीयांना भावते ते श्रीकृष्णाचे बाळरूप. ‘गोकुळाचा सखा, अंत:पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नरनारी, गुढ्या-पताका-तोरणे करिती कथा, गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले आनंदे’ हा तुकाराम महाराजांचा अभंग या दिनी आठवतो. शहरात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, उद्या दहीहंडी व गोपाळकाल्याचा उत्सव रंगणार आहे.

श्रीकृष्ण ज्ञान मंदिर
येथील केडिया प्लॉटमध्ये महानुभाव पंथीयांचे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर असून, त्याची स्थापना 1978 ची आहे. या मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात होतो. यंदाही सकाळी नित्यनियमाप्रमाणे पूजा, आरती, प्रसादाचे वितरण झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण लीलांचे वाचन करण्यात आले. रात्री 8 ला महिला भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री 11.30 वाजता श्रीकृष्ण जन्म अध्यायाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर बालरूपातील श्रीकृष्णाला मंदिरातून सजवलेल्या पाळण्यात घातले जाते. त्यानंतर पूजा होऊन विडा अर्पण केला जातो. आरती होऊन प्रसादाचे वितरण करण्यात येते, अशी माहिती कळमकर बाबाजी यांनी दिली. मंदिरातील श्रीकृष्ण मूर्तीचीही सजावट करून विद्युत रोशणाई करण्यात आली होती.

सुधीर कॉलनीत दहीहंडी उत्सव
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त 18 ऑगस्टला सुधीर कॉलनीतील पटांगणात विवेकानंद उत्सव मंडळ व अखिल भारतीय विद्यार्थी मराठा महासंघातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. दहीहांडीत चार थर म्हणजे साधारणपणे 20 फूट उंची राहील. सायंकाळी 7 ला होणार्‍या या उत्सवाचे उद्घाटन प्रदीप उर्फ बंडू देशमुख यांच्या हस्ते होईल, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत पिसे, विनायक पवार, योगेश थोरात, विक्रम गावंडे आदींची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शरद पवार यांनी केले आहे.

योगिनी समाजसेवा संस्थेतर्फे जन्मोत्सव
योगिनी समाजसेवा संस्था व रजधूळ मासिक परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा, गोपाळकाला व महाप्रसादासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आज 17 ऑगस्टला रात्री 10 ते 12 दरम्यान अभिषेक, मंत्रजागर तसेच जन्माष्टमी पोथीचे वाचन भूषण महाराज व्याघ्रांबरे यांच्या उपस्थितीत होईल, तर उद्या 18 ऑगस्टला सकाळी 10 ते 12 दरम्यान श्री गुरुदेव भजन मंडळ, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांचे काल्याचे कीर्तन, गोपूजन होऊन महाप्रसाद होईल. नवीन महाराजा अग्रसेन भवन, जवाहरनगर येथे होणार्‍या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन देवका देशमुख, डॉ. विजय दुतोंडे, नानासाहेब देशमुख आदींनी केले आहे.

शिव सेवा प्रतिष्ठानतर्फे दहीहांडी
शिव सेवा प्रतिष्ठानतर्फे गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून, गोविंदा पथकासाठी प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये ठेवले आहे, तरी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा मोहोड यांनी केले आहे. शिव सेवाच्या वतीने यंदा 18 ऑगस्टला संत तुकाराम चौकात सायंकाळी 7 ला दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोविंदा पथकांना कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, तरी ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संपर्क साधून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी सागर मोहोड, राहुल सरोदे, अमोल कदम, चंदन गिरी, प्रथमेश देशमुख, प्रतीक वानरे, सागर देशमुख, राम इंगळे, सुनील दाते पुढाकार घेत आहेत.

राजराजेश्वर कथेचा देखावा
शास्रीनगरातील संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी दरवर्षी गोकुळाष्टमीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच दरवर्षी प्रतीक्षा देशमुख श्रीकृष्णाचा पाळणा सजवण्यासोबतच सामाजिक संदेश देणारा देखावा साकारते. प्रतीक्षा इयत्ता बारावीला शिकत असून, तिला मेहंदी, चित्रकला व सजावटीचा विशेष छंद आहे. तिने यंदा श्रावण मासानिमित्त शहराचे आराध्यदैवत राजराजेश्वराची आख्यायिका देखाव्यातून साकारली आहे. मध्यरात्री पूजेचे ताट घेऊन राजेश्वराचे पूजन करणारी राणी, तिचा पाठलाग करणारा अकोलसिंह राजा, असदगड, त्याकाळी राजेश्वराच्या लिंगाभोवती असलेले जंगल आदी तिने साकारले असून, विद्युत रोशणाई केली आहे.