आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रीसूर्या’ घोटाळा, शेकडो नागरिकांची फसवणूक; पोलिसांची दिरंगाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला_ श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी घोटाळाप्रकरणी कारवाई करण्यात अकोला पोलिसांनी दिरंगाई केल्याची बाब उजेडात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी नागपूर येथे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अकोल्यातील गुंतवणूकदारांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई न करताच तक्रार नागपूर पोलिसांना वर्ग केल्याचे गुंतवणूकदारास कळवून स्वत:ची सुटका करून घेतली होती. रामदासपेठ पोलिसांनी तब्बल 108 दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी घेतले.
समीर व पल्लवी जोशी यांनी सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीत गुंतवणुकीसाठी अवाढव्य व्याजाचे आमिष दाखवून शेकडो लोकांचे कोट्यवधी रुपये लाटले. पोलिस तक्रारीची दखल घेत नसल्याने आणि सूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी पैसे परत देत नसल्याने गुंतवणूकदार ददगाळ यांनी शासनाकडे धाव घेतली. गृहमंत्री आर. आर. पाटील, पोलिस महासंचालक कार्यालयाकडे निवेदन दिले. त्यानंतर कारवाईच्या हालचालींना वेग आला. अखेर रामदासपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.
तक्रारीचा पाठपुरावा अन् पोलिसांची टाळाटाळ
फसवणुकीच्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने संबंधित गुंतवणूकदार, तक्रारदाराने 25 सप्टेंबरला मंत्रालयात गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गृहमंत्री पाटील यांनी निवेदनावर शेरा मारत अकोला पोलिस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. गुंतवणूकदार पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनाही भेटले. त्यांनाही फसवणुकीबाबत माहिती दिली. भारती यांनीही पोलिस अधीक्षकांना पत्र दिले. ‘या तक्रारीची सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करावा आणि तसे तक्रारकर्त्यास कळवावे’, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. त्यावर रामदासपेठ पोलिसांनी तक्रारकर्त्यास 29 नोव्हेंबर आणि 18 ऑक्टोबरला पत्र दिले. नागपूर येथे गुन्हा दाखल झाल्याने ही तक्रार नागपूरला पाठवल्याचे पोलिसांनी पत्रात नमूद केले.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश बासनात
दखलपात्र तक्रारीबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी एका निकालात ऊहापोह केला. दखलपात्र तक्रारीत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. एखाद्या तक्रारीची पोलिसांना गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशीची गरज भासत असल्यास चौकशी करावी. मात्र, ही चौकशी सात दवसांच्या आत संपवावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. ‘सूर्या’च्या तक्रारीत पोलिसांनी उपरोक्त आदेश का लक्षात घेतले नाहीत, असा प्रश्न गुंतवणूकदारांमधून उपस्थित होत आहे.
धनादेश हस्तांतरणावरही आक्षेप
सूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा मुख्य प्रवर्तक समीर जोशीने रामदासपेठ पोलिसांमार्फत गुंतवणूकदारास धनादेश दिले. मात्र, हे धनादेश वटले नाहीत. या समेटावरही गुंतवणूकदाराने आक्षेप घेत 9 ऑक्टोबर 2013 रोजी पोलिस संचालकांना पत्र पाठवले. ‘हा समझोता आम्हास न कळवताच का करण्यात आला’, असा प्रश्न पत्रात उपस्थित करण्यात आला.
कारवाई होणे आवश्यक
सूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीविरुद्धच्या तक्रारीनुसार सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा दखलपात्र तक्रारीमध्ये दाखल होणे आवश्यकच असते.
-वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक, अकोला.
तर वेगळे दिसले असते चित्र
सूर्या कंपनीची विदर्भात अकोल्यात 18 ऑगस्टला तक्रार केली. त्यानंतर नागपूर येथे 14 सप्टेंबरला जोशी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. 30 ऑक्टोबरला अमरावतीत जोशींसह पितळेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अमरावती पोलिसांनी 30 नोव्हेंबरला पितळेंच्या अकोल्यातील निर्माणाधीन बांधकामावर सूचना चिकटवून मालमत्तेचे मूळ दस्तऐवज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अमरावती पोलिसांनी तक्रार नागपूर पोलिसांकडे वर्ग न करता गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अकोला पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्याच्या दिवशीच अशी कारवाई का केली नाही, पोलिसांनी समेटासाठी का पुढाकार घेतला, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अकोला पोलिसांनी सर्वप्रथम गुन्हा दाखल करून कारवाई केली असती तर आज घोटाळ्याचे चित्र वेगळे पाहावयास मिळाले असते, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.