आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड : कुंभारी तलावामध्ये सापडली बंदूक, चाकू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मलकापूरचे सरपंच, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडात आरोपींनी वापरलेली पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात पोलिसांना शुक्रवार, 30 ऑगस्टला यश आले आहे. हे शस्त्र कुंभारी येथील तलावामधून हस्तगत करण्यात आले.

सिद्धेश्वर देशमुख यांच्यावर 23 ऑगस्टला हल्ला करण्यात आला. हत्याकांडात पिस्तूल आणि चाकूचा वापर करण्यात आला. गोळीबारानंतर देशमुख यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले होते. त्यांची हत्या केल्यानंतर आरोपी नीलेश काळंके आणि मोहन उर्फ बल्लू मार्कंड हे फरार झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी 29 ऑगस्टला विष्णू डापके या आरोपीला अटक केली. या आरोपीच्या चौकशीनंतर पोलिसांनी शस्त्र जप्तीची दिशा निश्चित केली. त्यानुसार 30 ऑगस्टला पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार शैलेश सपकाळ, उपनिरीक्षक पंकज उदावंत, एएसआय हनुमंत वानखडे, राजपालकसिंग ठाकूर, प्रकाश तायडे, अनिल धनभर, दशरथ बोरकर, जयंत सोनटक्के, वसीम खान, किशोर सोनोने, र्शीकांत पवार, अनिल राठोड, शेख रकिक, शेख रशिद आदींनी केली.

उद्या संपणार पीसीआर
देशमुख हत्याकांडातील तीनही आरोपींची पोलिस कोठडी 1 सप्टेंबर रोजी संपणार आहे. मात्र पोलिसांना आणखी एक आरोपी हवा आहे. त्यामुळे पोलिस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.

साईबाबांचे दर्शन
आरोपी कारंजामार्गे औरंगाबाद येथे गेले. तेथून ते शिर्डीला गेले. साईबाबांच्या दर्शनानंतर नवापूर, सूरत आणि अहमदाबादला गेले. गुन्हा घडल्यानंतर त्यांनी मोबाइल बंद केले. तेथून ते लॅन्डलाइनद्वारे नातेवाइकांच्या संपर्कात होते.

20 हजारांत पिस्तूल
आरोपींनी हत्याकांडात वापरलेली देशी बनावटीची पिस्तूल 20 हजार रुपयांमध्ये विकत घेतली. ही पिस्तूल त्यांनी मध्य प्रदेशातून खरेदी केली. पिस्तूल सात एमएम कॅलिबरची आहे. ही पिस्तूल कुंभारी तलावातून जप्त केली.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. आरोपी अविनाश वानखडे याचा शोध घेण्यात येत आहे.’’
शैलेश सपकाळ, ठाणेदार, खदान पोलिस ठाणे

चाकूही मल्टिपर्पज..
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला चाकू मल्टिपर्पज आहे. चाकूचे पाते सहा इंच लांब असून, मूठ पाच इंचांची आहे. शक्यतोवर हा चाकू लष्करातील जवान वापरतात. बल्लू मार्कंड हा सीमा सुरक्षा दलात कार्यरत असल्याने त्याने हा चाकू तयार करून घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.