अकोला- शहरातील वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहा चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्याचे कंत्राट देण्यात आले असून, तीन चौकात १५ जूनपर्यंत सिग्नल व्यवस्था सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाने दिली.
प्रशासनाने शासन निधीतून शहराच्या १३ मुख्य चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्यासाठी महासभेत निधी मंजूर केला होता. २१ ऑगस्टला हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. विविध कारणांमुळे हे काम रखडले होते. परंतु, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. सिग्नल बसवणाऱ्या कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सिग्नल बसवण्याच्या निविदांना दुसऱ्या वेळी चांगला प्रतिसाद मिळालाच. परंतु, ३० टक्के बिलो दराने निविदा दाखल झाल्या.
संबंधित कंपनीला कामाचे आदेश दिल्यानंतर १५ जूनपर्यंत तीन चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. त्यानंतर उर्वरित चौकात सिग्नल व्यवस्था सुरू होईल.
दहापैकी कोणत्या तीन चौकात ही सुविधा सुरू करावी, याबाबत अद्याप निर्णय घेतला नसला तरी ज्या चौकात त्वरित सिग्नल व्यवस्था सुरू करणे शक्य आहे, अशा तीन चौकात ही व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
वायरलेस सिग्नल व्यवस्था सुरू करण्याचा अंतिम निर्णय घेणार मनपा प्रशासन
दहा चौकांमधील काही रस्त्यांचे डांबरीकरण नुकतेच झाले आहे. त्यामुळे आता सिग्नलचे काम करताना वायर टाकण्यासाठी रस्ता खोदावा लागणार आहे. त्यामुळे नगरसेवक तसेच सर्वसामान्य नागरिकांची ओरड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ता खोदण्याचे काम पडू नये, यासाठी वायरलेस सिग्नल व्यवस्था सुरू करावी, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावर सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. वायरलेस सिग्नलचा निर्णय घेतल्यास काही प्रमाणात खर्चात वाढ होईल.
परंतु, ३० टक्के बिलो दराने निविदा प्राप्त झाल्याने महापालिकेला स्वत:चा निधी टाकण्याची गरज पडणार नसल्याने या निर्णयाला कोणी विरोध करणार नाही, अशी अपेक्षा विद्युत विभागाने व्यक्त केली आहे.