आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Signature Campaign Will Be Implemented For The Cultural Hall

सांस्कृतिक सभागृहासाठी आता युवकही सरसावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहराच्या विकासाचे द्योतक असलेल्या सांस्कृतिक सभागृहासाठी तीन तपांपासून सुरू असलेल्या नाट्यकर्मींच्या लढ्यात आता तरुणाईही सामील होणार आहे. शहरातील सर्व महाविद्यालयांमधून युवक-युवतींमध्ये सांस्कृतिक सभागृहाची गरज पटवून दिल्यानंतर प्रमुख चौकांमध्ये सांस्कृतिक सभागृहासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे.
अकोल्यातील सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडला आहे. कधी निधी तर कधी जागेची उपलब्धता नसल्याने अकोलेकरांना अद्यापपावेतो अद्ययावत सांस्कृतिक सभागृह मिळालेले नाही. त्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मींनी मोठा लढा उभारला. अकोल्यात सर्वसमावेशक समितीचे गठन करून सभागृहासाठी प्रशासनाकडे मागणीही करण्यात आली. मात्र, निधी प्राप्त होऊनही सभागृहाचा प्रश्न सुटला नाही. दिवसेंदिवस हा लढा तीव्र होत असून, नव्याने आलेल्या राज्य शासनाने राज्यातील प्रलंबित सभागृहासाठी अर्थसंकल्पात निधी ठेवल्याचे जाहीर केल्यानंतर पुन्हा हालचालींना वेग आला आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडूनही अकोलेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
आता या लढ्यात तरुणाई उतरली असून, सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी कंबर कसली आहे. कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गेल्या काही दशकांपासून अकोलेकर कलावंत झगडत आहेत. त्याकरिता वेळोवेळी संबंधितांना निवेदने देऊन मागणी करण्यात आली. मधल्या काळात शहरातील युवा कलावंतांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त, विरोधी पक्षनेते आदींना निवेदन देऊन आपली समस्या मांडली.

त्यानंतर जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून बाल कलावंतांनी सांस्कृतिक सभागृहाअभावी महापालिकेच्या आवारातच नाटकाचा प्रयोग सादर करत या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मलकापूर-अकोला शाखेतर्फे आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात सभागृहासाठी आवाजी ठरावासह स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. आता सिद्धी गणेश प्रॉडक्शन शहरातील तरुण रंगकर्मी सांस्कृतिक सभागृहासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्वाक्षरी अभियान राबवणार आहे. चौकांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी सहा अशा कालावधीत सभागृहाच्या समर्थनासाठी त्यांची स्वाक्षरी घेण्यात येईल.
‘सा’अॅकेडमीत झाली सभा : सांस्कृतिकसभागृहाच्या प्रश्नावर रंगकर्मी तरुणांची एक सभा अकोला आकाशवाणीसमोरील सा अॅकेडमीत नुकतीच झाली. या सभेत सभागृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरवण्यात आली.

महाविद्यालयांमध्ये जागृती
सिद्धीगणेश प्रॉडक्शन तरुण रंगकर्मींमार्फत सांस्कृतिक सभागृहाची गरज आजच्या युवक-युवतींना कळावी म्हणून सर्व महाविद्यालयांमधून जनजागृती करण्यात येणार आहे. आमच्या पिढीने सभागृहाऐवजी नाटक, कलांचे सादरीकरण केले. मात्र, तुम्ही अद्ययावत सभागृह मिळावे म्हणून पुढे या, अशी हाक तरुणाईला देण्यात येणार आहे.
तरुणाईवर भर
- अद्ययावत सांस्कृतिक सभागृहाच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी आता तरुणाईवर विशेष भर देण्यात येईल. सर्व शाळा, महाविद्यालयांमधून याविषयी जनजागृती करून त्यांना या लढ्यात सामील करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यासाठी माझ्यासोबत रंगकर्मी अनिल कुळकर्णी, उदय दाभाडे, संदीप जोशी, अमोल ताले, आकाश गावंडे, महेश इंगळे, श्रीकांत गावंडे, सागर देशमुख आदींनी पुढाकार घेतला आहे.''
सचिन गिरी, सिद्धी गणेश प्रॉडक्शन