आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात स्काय बस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महानगरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी मेट्रो व मोनो रेलचा वापर सुरू झाला आहे. याच धर्तीवर लहान व मध्यम शहरासाठी स्काय बस (कॅब-लहान वाहन)चा वापर काही देशांनी सुरू केला आहे. ही योजना शहरात सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बांधा, वापर व हस्तांतरित करा, या तत्त्वावर असलेल्या व महापालिकेला कोणताही खर्च न कराव्या लागणा-या या योजनेला लवकरच महासभेत मंजुरी दिली जाईल, अशी माहिती उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी दिली.

लोकसंख्या वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे रस्ते ठप्प झाले आहेत. वाहने ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे घरात वाहन असतानाही वाहन रस्त्यावर आणणे अवघड झाले आहे. ही समस्या केवळ मुंबई, दिल्ली आदी मेट्रो सिटींपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या समस्येने अकोला शहरांसारख्या लहान व मध्यम शहरांनाही घेरले आहे. त्यामुळे जमिनीऐवजी जमिनीच्यावर वाहतुकीचे नवनवीन प्रयोग सुरू झाले आहेत. देशात मेट्रो शहरांमध्ये मेट्रो व मोनो रेलचा वापर सुरू झाला आहे. याच धर्तीवर लहान व मध्यम शहरासाठी स्काय बसचा वापर जवळपास 50 देशांनी सुरू केला आहे. भारतात अद्याप ही स्काय बस सेवा सुरू झाली नसली, तरी अमृतसर, नोएडा या शहरांमध्ये या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुदैवाने ही योजना अकोला शहरातही राबवण्यात येणार आहे, अशी माहिती रफिक सिद्दीकी यांनी दिली.

गणेश इनोवेशन अकोला या कंपनीने प्राथमिक अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. महापालिकेच्या महासभेत या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा रेल्वेस्थानक ते मदनलाल धिंग्रा चौक (बसस्थानक) या 1.6 किलोमीटरच्या मार्गावर राबवली जाणार आहे. कंपनी या योजनेच्या उभारणीचा संपूर्ण खर्च स्वत: करणार आहे. यात महापालिकेला किती रॉयल्टी मिळेल? यावर महासभेत सर्वानुमते चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही रफिक सिद्दीकी म्हणाले.

अत्यल्प खर्च : मेट्रो अथवा मोनोसाठी एक किलोमीटरच्या कामाला जेवढा खर्च येतो, त्याच्या दहा टक्के खर्च स्काय बसला लागतो. त्यामुळे ही योजना अधिक प्रमाणात पैसा खर्च न करता सुरू करता येते.
ही योजना राबवण्यासाठी अत्यल्प जागा लागणार आहे. दर 30 ते 40 मीटर अंतरावर एक पिल्लर उभा केला जाईल. पिल्लरसह गाइड-वे (ट्रॅक) ही स्टीलचे तसेच मूव्हेबल राहणार आहेत. एखादवेळी उड्डाणपूल अथवा इतर विकास काम करताना स्काय बसची अडचण आल्यास पिल्लर व गाइड-वे इतरत्र हलवणे सोयीचे होईल.
मेट्रोची प्रवासी वाहतूक क्षमता 2500, तर मोनोची 1000 हजार आहे. एका स्काय बसची प्रवासी वाहतूक क्षमता दहा आहे. संपूर्ण फायबरची बस ताशी 40 ते 45 किलोमीटर धावते. सौरऊर्जा, पेट्रोल तसेच इलेक्ट्रिकवरही ही बस धावू शकते. शहरात स्काय बसचे हब मदनलाल धिंग्रा चौकात बांधण्यात येणार आहे. ही बस सुरू झाल्यानंतर भविष्यात शहरात निर्माण होणा-या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.