आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍मॉल फॅमिली, हेल्दी फॅमिलीचे सर्वेक्षण दौरे, आंदोलनामुळे रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्रशासनाने देशातील प्रत्येक शहरातील नागरिकांच्या जीवनमानाच्या माहितीसह कुटुंबातील व्यक्तींचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. कोलकाताच्या सेंट्रल कमर्शियल ऑफ इंडिया (सीसीआय) या संस्थेला हे काम दिले आहे. हेल्दी फॅमिली - स्‍मॉल फॅमिली या नावाने हे सर्वेक्षण इतर राज्यात सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही हे सर्वेक्षण केले जाणार असून, शहरात सर्वेक्षण करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्ज सादर केला आहे.
यापूर्वी अधिकारी दौऱ्यावर गेले असल्याने आणि आता कामबंद आंदोलनामुळे हे नाहरकत प्रमाणपत्र रखडले आहे.

सर्वेक्षणांतर्गत शहरात घरोघरी जाऊन कुटुंबप्रमुखाचे नाव, घरातील व्यक्तींची संख्या, महिला, पुरुष, त्यांचे वय, शिक्षण, घर कच्चे की पक्के, वाहन, आधार, रेशन कार्ड आहे का? यासह २४ प्रकारची माहिती संकलित केली जाणार आहे. याचबरोबर प्रत्येकाच्या घरावर पट्टी लावून त्यावर घर क्रमांक, गट क्रमांक टाकला जाणार आहे. कंपनीने अकोला महापालिकेकडे सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर केला आहे. या अर्जासोबत केंद्र राज्य शासनाचे पत्रही जोडण्यात आले आहे. महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यात या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली जाणार आहे. ही सर्व माहिती संकलित करताना कागद, नंबरप्लेट कंपनी देणार असून, प्रत्येक नागरिकाकडून यासाठी २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कंपनीने नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने प्रमाणपत्र मिळण्याचे काम रखडले होते. आता कामबंद आंदोलनामुळे पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. या वर्षभरात कंपनीला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.