आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजगराला जीवदान, सर्पमित्रांच्या पुढाकारातून सोडले जंगलात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजस्र अजगर म्हटला की पाहणाऱ्याची बोबडीच वळते. अकोट-शेगाव मार्गावरील शेतात असाच एक अजस्र अजगर शेतातील झोपडीत शिरल्याने गोंधळ उडाला. मात्र, सर्पमित्रांच्या पुढाकाराने त्याला ताब्यात घेऊन त्याची जंगलात सुखरूप सुटका करण्यात यश आले.
उन्हाळ्याची तीव्रता शिगेला पोहोचली असून, पावसाळ्याची चाहूल लागणार आहे. अशा काळात साप बाहेर निघण्यास सुरुवात होते. त्यात शेताचा परिसर म्हटला की सापाची उपस्थिती गृहीत धरायला हवी. अकोट-शेगाव मार्गावर उणळ नाल्याजवळ किशोर गिते यांचे शेत आहे. रविवारी ३१ मे ला सायंकाळी ते आपल्या शेतात असताना त्यांच्या शेतावरील झोपडीत अजस्र अजगर आढळून आला. त्यांनी आरडाओरड करत झोपडीबाहेर पळ काढला. काही वेळानंतर त्यांनी परिसरातील सर्पमित्र करण ठाकूर यांना दूरध्वनीवरून अजगराविषयी माहिती देऊन पाचारण केले. ठाकूर यांनी अकोल्यातील सर्पमित्र शेख महम्मद उर्फ मुन्ना यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. लगेच शेख मुन्ना घटनास्थळी दाखल झाले. तोवर अजगराने झोपडीचा ताबा सोडून उणळ नाल्यात ठाण मांडले होते. नाल्याचा बिकट परिसर असल्याने अजगराला ताब्यात घेण्यात अडचणी येत होत्या.
मात्र, तासाभराच्या मेहनतीनंतर सर्पमित्र शेख मुन्ना यांनी अजगराला पकडले. त्यानंतर शेतकरी किशोर गिते बघ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्याला एका पोत्यात जेरबंद करून अकोला वन विभागात आणले. आज वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात त्याला जंगलात सोडण्यात आले.
लक्ष वेधणारी अजगरची विविध वैशिष्ट्ये
सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात अजगरचा समावेश होतो. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात अधिक आढळतात. याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात. घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनीवरही यांचा वावर असतो. पायथॉन रेटिक्युलेटस या सर्वात मोठ्या अजगराची लांबी १० मी. पर्यंत तर घेर २५ सेंमी. आढळला आहे. त्याच्या त्वचेवर गुळगुळीत, चमकदार खवले असतात. पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गडद तपकिरी रंगाचे ठिपके, पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात. पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात. डोळे पिवळे असून, बाहुल्या आडव्या असतात.
अजगराच्या वरच्या ओठावरील खाचांना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्ष्याची जाणीव होते. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छवासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो. यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते. जानेवारी ते मार्च हा अजगरांचा मिलन काळ असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी - १०० अंडी घालते. पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते. काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते.
शेतातील सापांची काळजी घ्या
- शेत परिसर, माळरान, जंगल हे तर सापांचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे आपल्या शेतात सापांचे अस्तित्व आढळल्यास शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, मात्र सापांना इजा करू नये किंवा सर्पमित्रांना बोलावून त्यांना पकडण्याचा आग्रह करू नये. त्यांच्यापासून शेतकऱ्यांना लाभच आहे. शेत परिसरातील साप तेथील उंदरांवर नियंत्रण ठेवतात, पर्यायाने शेतीचे नुकसान टाळले जाते.''
सर्पमित्र शेख महम्मद उर्फ मुन्ना