आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Forestry Department,latest News In Divya Marathi

प्रत्येकाने निसर्गाचे संवर्धन करण्यास कटिबद्ध व्हावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- निसर्गाचा-हास ही जागतिक समस्या बनली असून, त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नही होत आहे. मात्र, ते कुठेतरी तोकडे पडतात. हे दुष्टचक्र रोखण्याकरिता प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन प्रा. एम. आर. इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.अकोला वनविभाग, वन्यजीव विभाग सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात ऑक्टोबरला आयोजित वन्यजीव सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर, उपवनसंरक्षक विजय गोडबोले, महापालिकेचे सहायक आयुक्त चंद्रशेखर गुल्हाने, कृषी महािवद्यालयाचे प्रा. ययाती तायडे, मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र तेलकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे महादेवराव भुईभार यांची उपस्थिती होती. शिवाजी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने ‘मानव वन्यजीव संघर्ष’ या विषयावर चर्चासत्र झाले. यात मिसबाह अहमद, नेहा खान, शाहिस्ता परविन, कल्याणी ठाकरे, वृषाली श्रीनाथ, गोपाल ढोबळे, मनोहर नारखेडे, देवश्री सोनोने, वैशाली तायडे, कुमारी पाचडे, चरणसिंह यांनी भाग घेतला. त्यांनी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा वन्यजीवांचा प्रश्न अन् वाढती लोकसंख्या हेच मानव वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची प्रमुख कारणे सांगून त्यावर दोघांनाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने उपाययोजना करण्याबाबतचे मत भाषणांमधून मांडले. त्यानंतर तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून प्रा. प्रकाश अाडे यांनी काम पाहिले. चर्चासत्रात प्रथम स्थान गोपाल ढोबळे याने पटकावले, तर द्वितीय देवश्री सोनोने आणि तृतीय क्रमांक नेहा खान, शाहिस्ता परविन यांना देण्यात आले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या वेळी बोलताना उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर म्हणाले की, कायद्यांऐवजी लोकजागृती महत्त्वाची आहे. त्यासाठीच अशा सप्ताहाचे आयोजन होत असून, सात दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला, तर महादेवराव भुईभार म्हणाले की, प्रत्येकाने मानव जातीसह पशुपक्षी, वनसंपदा या सर्वांवर भरभरून प्रेम करावे. तसेच सध्या निवडणुकांचा काळ असून, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्यासोबत वन, वन्यजीवांविषयी आपुलकी असणाऱ्याच लोकप्रतिनिधींची निवड करा, असेही ते म्हणाले, तर प्रा. ययाती तायडे यांनीही विचार मांडले. या वेळी विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक रमेशप्रसाद दुबे यांनी केले. कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. पुयाड, प्रा. आय. ए. राजा, सृष्टीवैभवचे उदय वझे, विश्व प्रकृती निधीचे संदीप सरडे, सातपुडाचे अमोल सावंत, प्रा. हर्षवर्धन देशमुख आदींची उपस्थिती होती.