आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Internet Surfing, Facebook, Whatsapp, Twitter

Social Media: मित्रांनो, सोशल होताय आचारसंहिता पाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - इंटरनेटमुळे जग जवळ आले. फेसबुक, व्हॉट्स अँप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या संकेतस्थळांमुळे माध्यमांचे जग विस्तारले आहे. परिणामी, सोशल मीडिया वापरणारी व्यक्ती बातमीदार, स्तंभलेखक बनली आहे. पण, हेच ‘सोशल नेटवर्किंग’ काही घटनांमध्ये त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.


अलीकडे सायबर गुन्ह्यांचे वाढत असलेले प्रमाण पाहता ‘सोशल नेटवर्किंग’ वापरताना सामाजिक भान ठेवण्याची नितांत गरज असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, सोशल नेटवर्किंग करताना कायम आचारसंहिता पाळणे आवश्यक झाले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज उपलब्ध होत असल्यामुळे ‘सोशल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘फेसबुक’ संकेतस्थळाद्वारे राजकीय पदाधिकार्‍यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व फोटो अपलोड करून बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. शिवाय प्रसारमाध्यमांची व पोलिसांची डोकेदुखी ठरणार्‍या अफवा ‘सोशल नेटवर्किंग’वर पसरत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या ‘सायबर सेल’पुढे ‘सोशल मीडिया’ला रोखण्याचे आव्हान आहे. याबाबत नागरिकांनी फिर्यादी होण्याची पोलिसांची अपेक्षा आहे. कारण, तक्रार आल्याशिवाय कारवाई करण्यास र्मयादा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षाच्या उमेदवाराची बदनामी करणारा मजकूर ‘व्हॉट्स अँप’वर टाकल्याबद्दल पुण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. अभिनेता आमिर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाची बदनामी केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने गुन्हा नोंदवला. दोन वर्षांपूर्वी कारंजालाड (जि.वाशीम) येथे फेसबुकवरील एका चित्रामुळे धार्मिक भावना दुखावल्याने दंगल उसळली होती. असे प्रकार वारंवार घडले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसे होऊ नये, म्हणून ‘सायबर सेल’ला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. इंटरनेटवरील माहिती नेहमी 100 टक्के खरी आहे किंवा नाही, याचा अंदाज लावणे कठीण असते. बर्‍याचदा गंमत म्हणून सोशल नेटवर्किंगवर पाठवलेल्या मजकुरामुळे दुसर्‍याच्या भावना दुखावणे, हा सायबर गुन्हा ठरत आहे. काही प्रकरणात गुन्हे दाखल होतात; पण आरोपींना पकडण्याचे व त्यांना होणार्‍या शिक्षेचे प्रमाणही कमी आहे. म्हणून ‘सोशल’ होताना आचारसंहितेची गरज भासत आहे.


पुढे वाचा ‘सोशल’ होताना काय केले पाहिजे....

‘सोशल’ होताना
कोणत्याही पोस्टला ‘लाइक’ व ‘कमेंट’ करण्यापूर्वी विचार करावा, अतिशय रागात किंवा दु:खी असाल तर ऑनलाइन जाणे टाळावे, ऑनलाइन मैत्री करताना काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तीचे प्रोफाइल तपासून मैत्री करावी, अनोळखी ऑनलाइन मित्रांना एकट्याने भेटणे टाळावे, कंटाळवाणे वाटते म्हणून ‘सोशल नेटवर्किंग’ हा पर्याय नव्हे, इंटरनेट वापरताना धोका किंवा अप्रिय घटना जाणवल्यास पालकांशी चर्चा करावी, इंटरनेटचा वापर करण्यास वेळेची र्मयादा ठेवावी, इंटरनेटवर स्वत:ची अनावश्यक माहिती देणे टाळावे, पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नये, पासवर्ड अवघड व सतत बदलता असावा, अनोळखी लोकांशी मोबाइलवर बोलणे शक्यतो टाळावे, गरज नसताना ‘ब्ल्यू टूथ’चा वापर टाळावा.
.
-ऑनलाइन असताना कुठलाही धोका, घोटाळा किंवा अप्रिय घटना आढळली, तर पोलिसांना माहिती द्यावी.
-सोशल संकेतस्थळावर आपली खरी, आवश्यक व योग्य तीच माहिती द्यावी.
-इंटरनेटचा अतिवापर, मोबाइलवर अवलंबित्व, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपणच आपली मदत करायला हवी.
-गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे असले तरी त्यातून पळवाटा शोधल्या जातात. त्यामुळे जबाबदारीची जाणीव हाच योग्य उपाय आहे.


माहिती तंत्रज्ञान कायदा
भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर 2008 मध्ये या मूळ कायद्याच्या मसुद्यात संसदेने काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या. या सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान सचिव ब्रजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. 2008 मध्ये संसदेने या दुरुस्त्यांना मान्यता दिली, तर 5 फेब्रुवारी 2009 ला राष्ट्रपतींनी सुधारित कायद्याला मान्यता दिली. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2009 पासून सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा अमलात आला.


सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय
संगणक किंवा मोबाइलच्या साह्याने माहितीची देवाणघेवाण करून केल्या जाणार्‍या गुन्ह्यांना सायबर गुन्हा म्हणतात. 2011-12 मध्ये आणि मागील वर्षी देशभरातील ‘सायबर सेल’कडे नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या बोलकी आहे. ‘सायबर क्राइम’ची संख्या दरवर्षी साधारणत: दोनशे पटींनी वाढत आहे. यामध्ये ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’, ‘फेक प्रोफाइल’, ‘सेक्शुअल हॅरासमेंट’च्या केसेस नोंदवले जात आहेत. गुन्ह्यांच्या तुलनेत शिक्षेचे प्रमाण कमी असल्याचे ‘एनसीआरबी’चा अहवाल सांगतो.


‘जबाबदार नेटिझम’ हवे : मोठय़ा शहरांमध्ये ‘जबाबदार नेटिझन्स’ चळवळी आहेत. सर्व वयोगटातील नेटिझन्सला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी चळवळ काम करते. देशासाठी जबाबदार नागरिक हवे, तशीच इंटरनेटच्या जगात जबाबदार नेटिझन्सची आवश्यकता आहे.


सायबर ‘गुन्ह्यां’चे ठळक प्रकार
0संगणक, मोबाइलवर अश्लील क्लिप तयार करून प्रसार करणे.
0इंटरनेटद्वारे बेकायदा अमली पदार्थांची विक्री करणे.
0इंटरनेटच्या माध्यमातून हवाला व्यवहार, पैशांची अफरातफर करणे
0बनावट सॉफ्टवेअरची निर्मिती व विक्री करणे.
0संगणकावरील माहिती चोरणे.
0 पासवर्ड हॅक करून दुरुपयोग.
0बनावट नोटा व प्रमाणपत्रांची निर्मिती.
0इंटरनेट, सोशल संकेतस्थळांद्वारे एखाद्याची बदनामी करणे.
0ई-मेल, व्हायरस हल्ला करणे,
0क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे.


सामाजिक भान जपण्याची आवश्यकता
‘सोशल नेटवर्किंग’वर दिशाभूल करणारी माहिती (अफवा) पसरवू नये, शिवराळ भाषा व शिव्यांचा वापर करू नये, ‘फेक अकाउंट’ तयार करून इतरांची बदनामी करू नये, देश, धर्म, जात, ऐतिहासिक जागा, देशातील नेते यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर टाकू नये, बीभत्स किंवा अप्रिय फोटो अपलोड करू नयेत. ‘सोशल नेटवार्किंग’ करताना सामाजिक भान जपावे.’’ -वीरेंद्र मिश्र, जिल्हा पोलिस अधीक्षक.