आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Food Department Collected Milk Sample, Divya Marathi

अन्न विभागाने घेतले ‘आरे’ दुधाचे नमुने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शासकीय दूध डेअरीमार्फत वितरण केल्या जाणार्‍या आरे दुधाच्या पाकिटावर तारखेचा उल्लेख नसल्याची तक्रार ग्राहकाने केली. यावरून 23 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजता अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी दूध डेअरीमधील दुधाचे नमुने घेतले. या प्रकाराची माहिती मिळताच दूध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती.
शासकीय दूध डेअरीमध्ये दूध निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना 22 फेब्रुवारी रोजी मशीनमध्ये रात्री 8.30 वाजता तांत्रिक बिघाड होऊन काही पाकिटांवर मॅन्युफॅरिंग डेट उमटली नाही. ही बाब लक्षात येताच काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी तत्काळ ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी नीलेश बंड यांनी खबरदारी म्हणून तत्काळ दूध पाकिटात भरण्याची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. तोपर्यंत 1000 लिटर दुधाच्या पाकिटाची निर्मिती झाली होती. शहराचा पुरवठा लक्षात घेता तत्काळ अमरावती येथे वाहन पाठवून उर्वरित दूध बोलावण्याची संबंधितांना सूचना दिली. त्यामुळे ते 1000 लिटर दुधाचे पाकीट वगळता उर्वरित दूध हे अमरावती दूध डेअरीने वितरित केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी सकाळी अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. एम. कोलते यांच्याकडे एका ग्राहकाने 23 फेब्रुवारी रोजी तक्रार केली की, त्याने खरेदी केलेल्या आरे दुधाच्या पाकिटावर तारखेचा उल्लेख नाही.
या तक्रारीच्या चौकशीचे आदेश सहायक आयुक्त कोलते यांनी अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश ताथोड यांना दिले. यावरून अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान शासकीय दूध डेअरीमधील दूध वितरण प्रणालीची माहिती घेतली. या घटनेबाबत जिल्हा दुग्ध विकास अधिकारी नीलेश बंड यांच्याकडून अधिक माहिती घेतली. मात्र, प्राथमिक चौकशीदरम्यान काहीही चुकीचे आढळले नाही.
नमुने ताब्यात : अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश ताथोड यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान दुधाच्या नमुन्यात दोष आढळला नाही. मात्र, चौकशीकामी पुढील कार्यवाहीकरिता त्यांनी काही दुधाच्या पाकिटाचे नमुने ताब्यात घेतले. हे नमुने उद्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात येणार आहेत.
काळजी घेतली
4तांत्रिक अडचणीमुळे पाकिटावर प्रिंट होणे बंद झाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही दुधाचे पाकिटाची निर्मिती रात्रीच थांबवली आणि दुधाची कमतरता भासू नये म्हणून अमरावती येथून दूध बोलावले.’’ नीलेश बंड, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, अकोला
दुधात दोष नाही
4दुधाचे नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक दृष्ट्या कुठलाही दोष आढळून आला नाही. तरीसुद्धा चौकशीकामी दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात येतील.’’ नीलेश ताथोड, अन्न सुरक्षा अधिकारी, अकोला.