आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकल्याण योजनांच्या माहिती पुस्तिका धूळखात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मागासवर्गींयांच्या प्रगतीसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने सरकारतर्फे माहिती पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. मात्र, या माहिती पुस्तिकांचे वितरण होणे आवश्यक असतानाही अनेक महिन्यांपासून समाजकल्याण विभागात या पुस्तिका धूळखात पडून आहेत.

सरकारतर्फे राबवल्या जात असलेल्या सर्व योजनांची माहिती लाभार्थ्यांना असावी, या हेतूने सामाजिक न्याय विभाग ‘वाटचाल सामाजिक न्यायाच्या दिशेने’ या माहिती पुस्तिकेचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाला दरवर्षी वितरण करत असते. या पुस्तिका स्वयंसेवी संस्था, बचतगट, सार्वजनिक वाचनालये, पंचायत समिती, नगरपालिका आणि शिबिरांमधून या पुस्तकांचे वाटप होणे करणे आवश्यक असते. मात्र, या पुस्तिकांचे वितरण सामाजिक न्याय विभागाकडून होत नसल्याने अनेकांना या योजनांच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. या वर्षीही हजारो माहिती पुस्तिकांचे वितरण न झाल्याने त्या समाजकल्याण विभागात धूळखात पडल्या आहेत. किती पुस्तिका समाजकल्याण विभागाला प्राप्त झाल्या याची माहिती या विभागाकडे नाही, तर काही ठिकाणी पुस्तिकांचे वितरण झाले, याबाबतही समाजकल्याण विभाग अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.

18 तारखेला वितरण होणार
या वेळी उरलेल्या पुस्तिका 18 ऑक्टोबर रोजी मुख्य सचिवांच्या हस्ते ‘विस्तारित समाधान योजनेचा मेळाव्यात’ वाटण्यासाठी ठेवण्यास जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. एस. एम. चव्हाण, साहाय्यक संचालक, समाजकल्याण

जिल्हा परिषदही उदासीन
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात हजारो माहिती पुस्तिका अनेक महिन्यांपासून पडून आहेत. ‘ज्याला गरज असेल त्यांनी घेऊन जावे’, अशा भूमिकेनुसार या पुस्तिकांचे वितरण केले जात आहे.

पुस्तिकांमध्ये माहिती काय?
शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करण्याची योजना, वैद्यकीय, तंत्रनिकेतन, कृषी, पशुवैद्यकीय, घरकुल योजना, तांडा वस्ती सुधार योजना, अपंगांच्या योजना, सर्व महामंडळांच्या योजनांसह अनेक योजनांची माहिती या पुस्तिकेत आहे.