आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेतील ‘रफ’ पक्ष्याचे अकोल्यातही दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दक्षिण आफ्रिकेतील ‘रफ’ या अतिदुर्मिळ पक्ष्याची अमरावतीनंतर आता अकोल्यातही हजेरी लागली आहे. अमरावतीला प्रथमच या पक्ष्याचे दर्शन घडल्याचे वृत्त दैनिक ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर 24 जानेवारीला हे पक्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानजीकच्या तलावावर हौशी छायाचित्रकार व पक्षी निरीक्षक शिशिर शेंडोकार यांना आढळला.
स्वीडन, स्कँडेव्हिया या युरोपातील देशांपासून ते थेट रशियापर्यंत या पक्ष्याचे वास्तव्य आहे. भारतात काही वेळा दलदलीच्या प्रदेशात तो स्थलांतर करतो. तो चिखलातील किडे खाणार्‍या सँडपायपर किंवा शांक पक्ष्याप्रमाणे दिसतो. त्याचे पाय लांब आणि पिवळ्या रंगाचे तर चोच लालसर अन् टोकावर काळ्या रंगाची असते. पंखावर मोठे ठिपके, पोटाचा रंग पांढरा असतो. या पक्ष्याला मराठीत गळाबंद पाणलाव असे म्हणतात.
रफ पक्षी काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रातील सहय़ाद्री पर्वतरांगा मार्गे प्रवास करून हिवाळा काळ गंगेचे खोरे तसेच पूर्व-पश्चिम घाटात घालवतो. यंदा त्याचे नागपूर, अमरावतीनंतर आता अकोल्यात दर्शन घडले आहे. विशेष म्हणजे अकोल्यातील छायाचित्रात त्याच्या मिलनाच्या काळातील रंग समोर आले आहेत. येथील उमरीतील शिशिर शेंडोकार कृषी विद्यापीठ परिसरात छायाचित्रणास गेले असता त्यांना तो आढळला. त्यानंतर 1 फेब्रुवारीलाही त्यांनी भेट देऊन त्याचे छायाचित्र टिपले.