आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Equipments For Blinds To Help In Reading

आता अल्पदृष्टीधारकही लुटतील वाचण्याचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राजकुमार पाखरे, प्रशांत पाखरे, गणेश मोहे, अक्षय कागदे, अभिषेक आसोलकर, रमेश खंडारे ही अल्पदृष्टी असणारी अंधत्वाच्या सुसह्य गटातील मुलं. दहा-वीस टक्के दिसण्याचा उपयोग त्यांनी अक्षर ओळख करून घेण्यासाठी केला. डोळ्यांच्या अगदी जवळ पुस्तक धरलं तर मोठं अक्षर त्यांना वाचता येऊ शकतं, अशा याच नाही तर इतर अल्पदृष्टीधारकांसाठी वरदान ठरणारी काही उपकरणं उपलब्ध झाली असून, या उपकरणांच्या साहाय्याने त्यांचे जीवन सुकर बनले आहे. येथील क्षितिज विरंगुळा केंद्रात या उपकरणांच्या मदतीने तासन् तास वाचन करण्यात हे सर्व मग्न असल्याचे दिसून येते. या उपकरणांमुळे आता आम्ही वाचनाचा आनंद घेऊन आपल्या ज्ञानात भर टाकत आहे, असे हसत-हसत ते सांगतात.

‘लो व्हिजन इक्विपमेंट्स’ म्हणजे विशिष्ट मॅग्निफायर्स वापरून बनवलेलं साहित्य नवजीवन देत आहे. पुणे येथील डॉ. रमेश साठे हे व्यवसायाने अभियंता. त्यांनी जिज्ञासेपोटी या क्षेत्रात लक्ष घातले. मेहनत, अभ्यासासोबतच अनेकांच्या भेटी घेऊन कामाला सुरुवात केली. डोळ्यांची रचना, अंधत्वाचं प्रमाण, त्यास अनुसरून बनवता येतील, अशा काही उपकरणांची डिझाइन्स असा द्राविडी प्राणायाम केला. त्यांना त्यांचे बंधू अनंत साठे यांचीही मदत झाली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांच्या संशोधनावर देश-विदेशात चर्चा, प्रबंधवाचन झाले. या संशोधनाची अल्पदृष्टीधारक व त्यांच्या कुटुंबीयांना मिळावी म्हणून ‘लो व्हिजन चेकअप कॅम्प’चे आयोजन सुरू केले. त्यासाठी डोळस लोकांना प्रशिक्षण दिले. शाळा, महाविद्यालयांमधून असे शिबिर आयोजित करून फळ्यावरील अक्षर धुसर दिसणार्‍यांची माहिती मिळवली. प्रशिक्षितांकडून त्यांची तपासणी केली व उपकरणांच्या साहाय्याने उर्वरित दृष्टी देण्याची किमया केली.

अशी मिळाली मदत
विरंगुळा केंद्राचे उपाध्यक्ष अतुल करंबळेकर यांनी त्यांच्या मुलाच्या मौंजीला अंध, अपंग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेवून 25 हजारांची सहकार्य राशी दिली. या राशीतून बरीच उपकरणं, सीसीटीव्ही कॅमेराही आला. मात्र, एलईडीसाठी निधी कमी पडला. तो प्रश्न मिटला फडके अँकेडमीच्या व्याख्यानमालेने. या व्याख्यानमालेतून उपलब्ध होणारा निधी आयोजकांनी क्षितिजला देवून मदत केली. इलेक्ट्रॉनिक्सचे विजय ढवळे यांनीही खारीचा वाटा उचलला.