आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉदर डे विशेष: वडिलांनी सायकलचे पंक्चर काढून मुलीला बनवले डॉक्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- घरी अठराविश्वे दारिद्र्य असले, तरी मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र अविरत कष्ट करणाऱ्या बापाच्या कष्टाचे चीज झाले. ही लेक नुसती डॉक्टरच झाली नाही, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून लोकांची सेवा करत आहे. अकोटफैल परिसरात राहणाऱ्या बाप-लेक, युवराज गवई आणि त्यांची लेक डॉ. सुजाता यांची जिद्द आणि संघर्ष प्रेरणादायी ठरत आहे.
सायकलचे पंक्चर काढणाऱ्या वडिलांना एक दिवस दम्याचा अटॅक आला, दुकान बंद पडलं. मुलीने आई, मेनिका यांच्यासोबत शेतमजुरी करायला सुरुवात केली. मुलीच्या शिक्षणाची गोडी पाहून वडिलांनादेखील शिक्षणात रस येऊ लागला. मुलगी सातवी-आठवीत असताना वडिलांनी दहावीची परीक्षा दिली. सुजाताचा अकोला आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमसला नंबर लागला.
सन २००६ मध्ये सख्खा आतेभाऊ सदानंद सावंग यांच्यासोबत सुजाताताईचा विवाह झाला. पती पोलिस कॉन्स्टेबल असून, एक वर्षानंतर त्यांची हिवरखेडला बदली झाली. सुजाताताई अमरावती जिल्ह्यातील पापळ वाढोणा येथे "वैद्यकीय अधिकारी' म्हणून जॉइन झाल्या. अाठ महिन्यांच्या गर्भवती सुजाताताईचा जवळपास ११ गावे लुनावर फिरण्याचा प्रवास सुरू झाला. मुलगी समृद्धीचा जन्म झाल्यानंतर सुजाताला लगेच जॉइन व्हावे लागले. आई, चिमुरडी समृद्धी आणि सुजाताताई अशा तिघींची प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी सुरू झाली. नोकरीच्या एक वर्षानंतर दुसरीकडे बदली व्हावी, यासाठी ताईंनी प्रयत्न सुरू केले, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागा नसल्याचे कारण देऊन टाळले. परत एकदा या बाप-लेकीचा संघर्षाचा प्रवास सु्रू झाला. या बाप-लेकींनी अनेक आरोग्य केंद्रात जाऊन जागा आहे का, यासाठी चप्पल झिजवली आणि त्यातूनच बुलडाणा जिल्ह्यातील बोथा काजी येथील प्राथमिक केंद्रात जागा असल्याचे माहीत पडले. मागील सात-अाठ वर्षांपासून सुजाताताई येथे काम करत आहेत.

सुजाताताईचे पती सदानंद सावंग यांचीदेखील अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये बदली झाली असून, सुजाताताई मुलगी समृद्धी, मुलगा आभास यांच्यासोबत अकोल्यात सुखाने नांदत आहे. ‘एक पंक्चर वाल्याची पोर’ अशी वडिलांमुळे मुलीची ओळख ते आता ‘एका मेडिकल ऑफिसरचे बाबा’ अशी पोरीमुळे वडिलांची ओळख, हा ओळखीमधला फरक घडवणारे ते वडील. ज्यांनी प्रत्येक वेळेला पोरीची जगण्याची आणि शिक्षणाची दुचाकी सायकल थांबता यशाच्या मार्गाने आजवर अविरत पोहोचती केली... आणि दरवेळेला या सायकलच्या मागची सीट पकडून प्रेरणा देणारे हे बाबा... सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
प्रेरणादायी प्रवास
घरीच शिवलेल्या जुन्या पॅन्टची स्कूल बॅग, डबल रोटीच्या जाड प्लास्टिक पिशव्यांपासून रेनकोट वापरणाऱ्या मुलीला एक दिवस रस्त्यात १९ रुपये सापडले, शिक्षकांना ते दिल्यावर त्यांनी तिच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून तिला परत केले. त्या पैशांनी तिने कंपास घेतला.
बातम्या आणखी आहेत...