आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इयत्ता दहावीची 15 जानेवारीला सराव परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच त्यांच्या मनातील परीक्षेविषयीची भीती दूर व्हावी, या हेतूने माध्यमिक शिक्षण विभागाने इयत्ता दहावीच्या इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांची सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 15 ते 18 जानेवारीदरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक सोनोने यांनी शनिवारी दिली. यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

दहावीचा निकाल उंचावण्यासाठी ही परीक्षा होत आहे. त्यानंतर गुण कमी का मिळाले तसेच त्यामध्ये वाढ होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे त्यांना शिक्षक समजावून सांगणार आहेत, उत्तरपत्रिकेवर वडिलांची स्वाक्षरी आणणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी सोनोने यांनी दिली. परीक्षा प्रत्येक शाळेत होईल. 23 तारखेला या परीक्षेचा निकाल तालुका केंद्राला दिला जाणार असून, 27 तारखेला शाळेकडून प्राप्त झालेले निकाल तक्ते तालुका प्रमुख जिल्हा संकलन केंद्रावर जमा करणार आहेत.

ही परीक्षा जिल्ह्यातील 409 माध्यमिक शाळांपैकी 372 शाळांमध्ये घेण्यात येणार असून, त्यामध्ये 24 हजार 446 विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी अशोक सोनोने यांनी दिली.

या बैठकीला स्मिता परोपटे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, बळीराम झामरे, शे. मुक्तार, कल्पना धोत्रे, प्रेमकुमार सानप, निरंजन बंड, दिनकर गायकवाड, मधुकर सिरसाट, मोहन खाडे, दादाराव वानखडे, भास्कर शिंगणे, अशोक आमले, इरफान अली, सुधाकर फुकट, एस. बी. खंडारे, विजयसिंग गहेलोत, लक्ष्मणराव देशमुख आदी उपस्थित होते.